रस्त्यात अडवून मुनिमाला मारहाण, पावणेतीन लाखांची लूट; काही तासांत ६ जण गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 06:03 PM2022-04-12T18:03:05+5:302022-04-12T18:04:12+5:30
लातूर येथील एका कोल्ड्रिंक्सच्या एजन्सीमध्ये मुनीम म्हणून काम करणाऱ्यास पाळत ठेवून लुटले
लातूर : टेम्पोने आमच्या गाडीला कट मारला, असे खोटे कारण सांगून पावणेतीन लाखाला लुटल्याची घटना सोमवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास लातूर ते लोदगा जाणाऱ्या रोडवर बाभळगाव शिवारात घडली. दरम्यान, पोलिसांनी काही तासांतच आरोपींना अटक करून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे.
लातूर येथील एका कोल्ड्रिंक्सच्या एजन्सीमध्ये मुनीम म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीवर पाळत ठेवून बाभळगाव शिवारात चोरट्यांनी त्याला गाठले. वाटेत आडवून तुझ्या टेम्पोने आमच्या गाडीला कट मारला असे म्हणून मारहाण केली. शिवाय, त्यांच्या जवळील २ लाख ७६ हजार रुपये जबरदस्तीने काढून चोरटे तेथून मोटारसायकलवरून पसार झाले.
याबाबत लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, लातूर ग्रामीणचे पोनि. गणेश कदम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अवघ्या काही तासांतच या प्रकरणाचा छडा लावला.
आकाश उत्तम गायकवाड (रा. लोदगा), अरविंद उर्फ कुलदीप बालाजी डावखरे (रा. वाल्मिकी नगर, लातूर), सचिन रघुनाथ दुबलगंडे (रा. पंचवटी नगर, लातूर), प्रदीप अनुरथ सूर्यवंशी (रा. शिवणी ता. औसा), अहमद निसार शेख (रा. पानचिंचोली, ता. निलंगा) आणि जाफर मलंग शेख (रा. पानचिंचोली, ता. निलंगा) या सहा जणांना ताब्यात घेतले. शिवाय, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.