शॉकींग! मूळशी पॅटर्न पाहून केला खून, अल्पवयीन आरोपीची पोलिसांकडे कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 08:20 AM2022-01-26T08:20:15+5:302022-01-26T08:21:32+5:30
राेहनने आपल्या मित्राच्या बाेलण्यावर विश्वास ठेवला आणि मनातील राग काढून टाकला. काही दिवसांपासून मारेकरी मित्र राेहनसाेबत गाेडीगुलाबीने राहत हाेता
लातूर : लातूर शहरात भरदिवसा खून झालेल्या रोहन उजळंबे प्रकरणात अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. मित्र असलेल्या रोहनशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याच्यावर कत्तीने वार केले. हा प्रकार मूळशी पॅटर्न व मालिका पाहून प्रसिद्धीच्या भावनेने केल्याची प्राथमिक कबुली आरोपीने दिल्याचे अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी सांगितले. राेहन उजळंबे हा इयत्ता बारावीमध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेत हाेता. दरम्यान, मित्र आणि त्याच्यामध्ये काही दिवसांपूर्वी भांडण झाले हाेते. याच भांडणाचा राग मनात ठेवत मित्रानेच त्याचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. आपले भांडण मिटले असून, आपण दाेघे मित्र आहाेत, असा विश्वास राेहन उजळंब याला मित्राने दिला हाेता.
राेहनने आपल्या मित्राच्या बाेलण्यावर विश्वास ठेवला आणि मनातील राग काढून टाकला. काही दिवसांपासून मारेकरी मित्र राेहनसाेबत गाेडीगुलाबीने राहत हाेता. राेहनलाही वाटले आपला झालेला वाद हा तत्कालिक हाेता. मात्र, मारेकरी मित्राच्या मनात भांडणाची खुन्नस कायम हाेती. याच रागातून राेहनचा खून करण्याचा विचार त्यांच्या मनात घाेळत हाेता. शेवटी रविवारी सकाळी भेटायचे आहे असे सांगून राेहनला घराबाहेर बाेलावून घेतले. घटनेपूर्वी ते लातुरात विविध ठिकाणी माेटारसायकवरून फिरत हाेते. दुपारी बारा वाजेच्या सुमारास दाेघेही विशालनगरातील साई मंदिर चाैकात आले. यावेळी सहज बाेलतबाेलतच साेबत आणलेल्या धारदार काेयत्याने फिल्मी स्टाईल पद्धतीने राेहनच्या गळ्यावर, डाेक्यात आणि चेहऱ्यावर सपासप वार केले. हल्ल्यात राेहन गंभीर जखमी झाला आणि जमिनीवर काेसळला. दरम्यान, शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी मृत घाेषित केले. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल केला हाेता. अखेर तिसऱ्या दिवशी पाेलिसांनी खूनप्रकरणातील आराेपी मित्राला ताब्यात घेतले आहे. शाळेच्या दाखल्यावरून त्याचे वय समाेर येणार आहे.
मारेकऱ्याची साेलापूर, पुण्यात भटकंती...
घटनेनंतर मारेकरी मित्राने लातूर जिल्ह्याची हद्द ओलांडली. ताे साेलापूर, पुणे आणि इतर ठिकाणी पाेलिसांना गुंगारा देत भटकत राहिला. साेबतचा माेबाइलही मारेकऱ्याने स्विच ऑफ केल्याचे पाेलिसांना आढळून आले. पाेलिसांची चार पथके मारेकऱ्याच्या मागावर हाेती. ताे पुण्यातून लातूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. याच माहितीच्या आधारे त्याला मंगळवारी सकाळी ताब्यात घेतले.
- निखिल पिंगळे, पाेलीस