डोक्यात रॉड घालून व्यावसायिकाचा खून; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह
By हरी मोकाशे | Published: September 27, 2023 08:11 PM2023-09-27T20:11:23+5:302023-09-27T20:12:38+5:30
या घटनेमुळे शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
लातूर : देवणी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्यावसायिक अशोक लुल्ले यांचा अज्ञातांनी डोक्यात रॉड घालून खून केल्याची घटना बुधवारी दुपारी त्यांच्या स्वत:च्या लॉजमध्ये उघडकीस आली. या घटनेमुळे शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
देवणी येथील अशोक मन्मथप्पा लुल्ले (६५) यांचे शहरातील उदगीर - निलंगा राज्य मार्गावर शिवपार्वती लॉज आहे. नेहमीप्रमाणे लुल्ले हे आपल्या लॉजवर थांबले होते. दरम्यान, कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन लागला नाही. त्यामुळे नातेवाइकांनी बुधवारी लॉजवर येऊन पाहिले असता एका खोलीत अशोक लुल्ले यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या डोक्यास रॉडसारख्या साहित्याने जबर मारल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन काटकर, देवणी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विष्णूदास गुट्टे, पोलिस उपनिरीक्षक कत्ते यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेऊन तपास सुरू केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
श्वान पथक दाखल...
या घटनेतील आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी श्वान पथकास पाचारण केले. तसेच ठसे तज्ज्ञांनाही बोलावण्यात आले आहे. पोलिस यंत्रणा तपास करीत आहे. लवकरच आरोपींचा शोध लागेल, असे उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन काटकर यांनी सांगितले.
बाजारपेठ बंद...
शहरातील प्रसिध्द व्यावसायिकाचा खून झाल्याची वार्ता काही वेळात शहरभर पसरली. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांनी तत्काळ आपली दुकाने बंद केली. शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी चाेख बंदोबस्त ठेवला आहे. मयत अशोक लुल्ले यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी ११:०० वाजता अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे नातेवाइकांनी सांगितले.