गाेठ्यातील तरुणाचा खून; ‘त्या’ मुलाने काढला काटा, एका दिवसात खुनाचा उलगडा
By राजकुमार जोंधळे | Published: December 31, 2023 11:11 PM2023-12-31T23:11:50+5:302023-12-31T23:12:23+5:30
गुन्ह्याची कबुली : एका दिवसात खुनाचा उलगडा...
औसा (जि. लातूर) : तालुक्यातील वडजी येथे शेतातील गाेठ्यात झाेपी गेलेल्या तरुणाचा अल्पवयीन मुलाने काटा काढल्याचे रविवारी समारे आले आहे. ताब्यात घेतलेल्या मुलाने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मयत रणजित तानाजी माळी याच्यावर पाळत ठेवत त्याचा झोपेतच धारधार शस्त्राने डोक्यात वार करून हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी समाेर आली. याबाबत भादा पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून खुनाचा ११ तासातच उलगडा केला.
पाेलिसांनी सांगितले, वडजीतील मयत रणजित तानाजी माळी (वय २५) हा दुग्धव्यवसायासह टेम्पो चालवित होता. दरम्यान, त्याला व्यवसायाची आवड हाेती. अविवाहित असलेल्या रणजित माळीचे गावातील एक महिलेशी प्रेमप्रकरण जुळले होते. याबाबतची कुजबुज गावात सुरू हाेती. त्या महिलेच्या अल्पवयीन मुलालाही याची कुणकुण लागली हाेती. आपल्या आईसाेबत तरुणाचे प्रेमसंबंध सुरू असल्यामुळे त्या मुलाच्या डाेक्यात राग हाेता. यातूनच त्याने मयत तरुणावर गत काही दिवसांपासून पाळत ठेवली. त्यांच्या मागावर असलेल्या मुलाने कट रचला आणि त्याचा काटा काढण्याचे प्लॅनिंग केले. यासाठी शेतीत कामासाठी लागणार असल्याचे कारण सांगत शस्त्राला धार करून घेतली, अशी माहिती पाेलिसांनी दिली.
तरुणावर पाळत ठेवून केला खून...
मयत हा त्यांच्या शेतातील गोठ्यात एकटाच मुक्कामी राहत असल्याची माहिती काढली. त्यानुसार रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास मयताच्या मोबाइलवर फोन करून झोपी गेल्याची खात्री केली. फोन उचलला नसल्याने त्याने मध्यरात्री झोपलेला तरुण रणजित माळी यावर शस्त्राने सपासप वार करून हत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी समाेर आली. पाेलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे गतिमान करत खुनाचा तपास केला.
त्या रात्री शेवटच्या माेबाइल काॅलने खुनाला फुटली वाचा...
मयताच्या मोबाइलवरील शेवटच्या कॉलने खुनाचा उलगडा झाला. तरुणाचा खून गावातीलच अल्पवयीन मुलगा असल्याचे तपासात समाेर आले. त्याच्या आईसह इतरांना चौकशीसाठी पाेलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत गुन्ह्याचा उलगडा झाला. तपास फौजदार कोव्हाळे करीत आहेत. - बाळासाहेब डोंगरे, सपाेनि. भादा