उदगीरमधील 'ती' हत्या अनैतिक संबंध व पैश्याच्या वादातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 07:06 PM2018-05-02T19:06:24+5:302018-05-02T19:06:24+5:30
तोंडार येथील मोहम्मद महेबुब वाडेकर यांचा मृतदेह आढळून आला होता़ दरम्यान, पोलीस तपासात अनैतिक संबंध आणि पैश्याच्या वादातून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे़
उदगीर (लातूर ): तालुक्यातील तोंडार येथील मोहम्मद महेबुब वाडेकर यांचा मृतदेह आढळून आला होता़ दरम्यान, पोलीस तपासात अनैतिक संबंध आणि पैश्याच्या वादातून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे़ त्यामुळे उदगीर ग्रामीण पोलिसांनी महिलेसह तिच्या पतीस मंगळवारी अटक केली़
तोंडार येथील मोहम्मद वाडेकर यांचा मृतदेह २९ एप्रिल रोजी गावातील शाळेच्या पाठीमागे आढळून आला होता़ मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येऊन आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़ दरम्यान, गळा आवळल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्याने आणि मयताचा मुलगा मुजीब मोहम्मद वाडेकर यांच्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलिसांत जीवे मारुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़
दरम्यान, पोलिसांनी तपास सुरु केला असता वाडेकर यांचा गावातील संगिता नामक महिलेसोबत अनैतिक व आर्थिक संबंध असल्याचे स्पष्ट झाले़ त्यामुळे संशयित महिलेस पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्हा कबुल केला़ २८ एप्रिल रोजी दुपारी वाडेकर व सदरील महिलेमध्ये पैश्याच्या कारणावरुन दोघांत वाद झाला होता़ तेव्हा तिने त्याला खाली पाडून गळा आवळून खून केला़ त्याचा मृतदेह शेजारच्या पडक्या वाड्यात टाकला़ रात्री तिचा पती घरी आला असता तिने घडलेली हकिकत सांगितली़ महिला व तिचा पती लक्ष्मण मष्णाजी कांबळे या दोघांनी वाडेकर यांचा मृतदेह शाळेच्या पाठीमागे टाकल्याचे कबूल केले असल्याचे पोलिसांनी सांगितले़
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ़ शिवाजीराव राठोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अनिल चोरमले, पोउपनि अल्ताफ मुलानी, बाबासाहेब थोरे, विजयकुमार पाटील, पोकॉ संतोष खोत, सुग्रीव मुंढे, कैलास चौधरी यांनी केला़
७ मे पर्यंत पोलीस कोठडी
उदगीर ग्रामीण पोलिसांनी आरोपी महिला व तिचा पती लक्ष्मण मष्णाजी कांबळे या दोघांना मंगळवारी अटक केली़ दोन्ही आरोपींना उदगीर येथील प्रथमवर्ग न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता आरोपींना ७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़