मोदीनंतर आता 'गडकरी गॅरंटी'; मराठवाड्याच्या विकासाची नितीन गडकरींनी दिली ग्वाही
By संदीप शिंदे | Updated: May 3, 2024 18:51 IST2024-05-03T18:50:19+5:302024-05-03T18:51:59+5:30
मराठवाड्यात जलसंवर्धनाचे काम वाढले तर शेतकरी जीवन संपवणार नाहीत.

मोदीनंतर आता 'गडकरी गॅरंटी'; मराठवाड्याच्या विकासाची नितीन गडकरींनी दिली ग्वाही
निलंगा : लातूरसह मराठवाड्याच्या विकासाची गॅरंटी माझी राहील. ही निवडणूक अन्नदाता शेतकरी सुखी होण्यासाठी आणि सामान्य जनतेच्या उन्नतीसाठी आहे. त्यामुळे अपप्रचार करणाऱ्यांना बाजूला सारा, असे आवाहन केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी निलंग्यातील सभेत केले.
मंचावर माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री आ. संभाजी पाटील-निलंगेकर, माजी खा. रूपाताई पाटील-निलंगेकर, आ. अमर राजूरकर, आ. देवराज होळी, उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले, गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने विकासाला गती दिली. आजवर साडेचार लाख खेडी महामार्गांना जोडल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा झाला. २०१४ मध्ये केंद्रात मंत्री झाल्यानंतर ई-रिक्षाची सुरुवात करून दीड कोटी लोकांची मानवी शोषणातून मुक्तता झाली. अजूनही ग्रामीण भागात शिक्षणाचा विस्तार झाला पाहिजे. शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. शरद जोशी यांनी शेतकऱ्यांचे जे प्रश्न मांडले, त्यावर भाजपा सरकार तोडगा काढत आहे. यावेळी उमेदवार खा. सुधाकर श्रृंगारे, डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, अरविंद पाटील निलंगेकर उपस्थित हाेते.
इथेनॉल निर्मितीतून प्रगती...
सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवते, तेलाचा भाव मलेशिया ठरवते, साखरेचा भाव ब्राझील ठरवते. त्यामुळे शेतमालाला भाव देण्यात अडचणी निर्माण होतात. खरे पाहता जल, जमीन, जंगल, जनावरे यांचा उपयोग करून शेतकऱ्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी सोयाबीन, मका, ऊस यावर प्रक्रिया करून इथेनॉल निर्मिती झाली तर शेतकरी समृद्ध होईल. शेतकरी निर्मित बायोएव्हिएशन इंधनावर हेलिकॉप्टर आणि स्पाइस जेट विमान यशस्वीरीत्या चालत आहे. शिवाय, मराठवाड्यात जलसंवर्धनाचे काम वाढले तर शेतकरी आत्महत्या होणार नाहीत.
संविधान बदलाचा अपप्रचार
विरोधक संविधान बदलले जाईल हा अपप्रचार करीत आहेत. मुळात घटनेतील मूल तत्त्वे कधीही बदलत नाहीत. उलट काँग्रेसने दुरुस्तीच्या नावाखाली ८० वेळा संविधान बदलले, असा आरोप करीत गडकरी यांनी आणीबाणीवर टीका केली.