माय-लेकाची कौतुकास्पद कामगिरी; बारावी परीक्षेत एकाच वेळी झाले उत्तीर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 07:31 PM2023-05-26T19:31:14+5:302023-05-26T19:31:36+5:30
विवाहामुळे शिक्षणात खंड पडला, माय-लेक सोबत पेपर देत झाले पास
- बाळू बुध्दे
हरंगुळ (बु.) : शिरुर अनंतपाळ तालुक्यातील उजेड येथील आई व मुलाने फेब्रुवारीत बारावी बोर्डाची परीक्षा दिली होती. या परीक्षेत दोघेही उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे कुटुंबात आनंद पसरला असून या यशाची तालुकाभर जोरदार चर्चा होत आहे.
लातूर तालुक्यातील हरंगुळ बु. येथील जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक शिवनगे यांचे मूळ गाव शिरुर अनंतपाळ तालुक्यातील उजेड आहे. त्यांचा विवाह सन २००० मध्ये मैना गुंतपल्ले यांच्याशी झाला होता. तेव्हा त्या अकरावीत शिक्षण घेत होत्या. विवाहामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला. तद्नंतर काही वर्षांनी मैना गुंतपल्ले यांनी पुढील शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला. त्यांनी गावातील उच्च माध्यमिक विद्यालयात १२ वीसाठी प्रवेश घेतला.
दरम्यान, त्यांचा मुलगा शुभम शिवाजी शिवनगे हा लातुरातील एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होता. आई मैना व मुलगा शुभम यांनी गत फेब्रुवारीत बारावी बोर्डाची परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. त्यात आईने इंग्रजीत ३७ गुण घेत यश संपादन केले तर मुलगा शुभमने कला शाखेत ७९ टक्के गुण घेत उत्तीर्ण झाला आहे. एकाच वेळी आई व मुलगा उत्तीर्ण झाल्याने त्यांची तालुकाभर चर्चा होत आहे.