निलंगा तालुक्यातील निटूर परिसरात पुन्हा गुढ आवाज
By हरी मोकाशे | Published: February 7, 2023 05:56 PM2023-02-07T17:56:10+5:302023-02-07T17:56:28+5:30
भूकंपाची कुठलीही नोंद भूकंप मापक वेधशाळेकडे झाली नाही.
केळगाव (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील निटूर परिसरात मंगळवारी पहाटे आणि दुपारी गुढ आवाज आला. त्यामुळे या परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आवाज येताच नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली.
निलंगा तालुक्यातील निटूर परिसरात मंगळवारी पहाटे ३.१५ वाजता आणि दुपारी १२.०५ वा. गुढ आवाज आला. त्यामुळे नागरिक तात्काळ घराबाहेर पडले. या आवाजामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहाटेच्या वेळी झालेल्या गुढ आवाजामुळे पक्षी, प्राण्यांचा मोठा कल्लोळ ऐकावयास मिळाला.
दोन दिवसांपूर्वी म्हणजे, शनिवारी दुपारी १.१४ वाजता गुढ आवाजाने हा परिसर हादरला होता. या घटनेची माहिती तहसीलदारांना कळविण्यात आली असता त्यांनी नायब तहसीलदार घनश्याम अडसूळ यांना पाठवून माहिती घेण्यास सांगितले.
भूकंप नाही...
मंगळवारी निटूर परिसरात गुढ आवाज आल्याची माहिती मिळाली. परंतु, तो भूकंप नाही. त्याची कुठलीही नोंद भूकंप मापक वेधशाळेकडे झाली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरु नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी केले आहे.