हमिभावामुळे नाफेडला पसंती; लातुरात १० हजार शेतकऱ्यांकडून ८४ कोटींचा हरभरा खरेदी
By हणमंत गायकवाड | Published: April 18, 2023 05:08 PM2023-04-18T17:08:30+5:302023-04-18T17:09:26+5:30
नाफेडकडून १६ केंद्रांवर खरेदी : हमीभाव अधिक असल्याने शेतकऱ्यांची पसंती
लातूर : जिल्ह्यात नाफेडची १६ हमीभाव केंद्रे सुरू असून या केंद्रांवर १८ एप्रिल अखेरपर्यंत १० हजार ७६९ शेतकऱ्यांच्या एक लाख ५८ हजार १७९ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे. ८४ कोटी ३८ लाख ८७ हजार ६८५ रुपयांचा हरभरा हमीभाव केंद्रावर खरेदी करण्यात आला आहे. बाजारभावापेक्षा हमीभाव केंद्रावर हरभऱ्याला यंदा चांगला दर असल्यामुळे शेतकऱ्यांची पसंती नाफेडकडे वाढली आहे.
जिल्ह्यामध्ये लातूरसह सेलू, मुरुड, अकोला, उदगीर, लोणी, औसा, चाकूर, रेणापूर, देवणी, अहमदपूर, शिरूर ताजबंद, सताळा, निलंगा-हालसी, शिरूर अनंतपाळ, जळकोट आदी १६ ठिकाणी हरभरा हमीभाव केंद्रे आहेत. या केंद्रांवर गेल्या महिनाभरापासून हरभऱ्याची खरेदी सुरू झालेली आहे. आतापर्यंत दहा हजार ७६९ शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात आला आहे. एक लाख ५८ हजार १७९ क्विंटलची खरेदी झालेली आहे. यापैकी ५३ हजार ३१९ क्विंटल हरभऱ्याचे पेमेंट संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. २८ कोटी ४४ लाख ५९ हजार ५३२ रुपयांचे पेमेंट नाफेडला प्राप्त झाले आहे. त्यापैकी सात कोटी १७ लाख ९८ हजार ४३० रुपयांचे पेमेंट ४ एप्रिलपूर्वीच प्राप्त झाले आहे. सद्य:स्थितीत २१ कोटी २६ लाख ६१ हजार १०३ रुपयांचे पेमेंट करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी विलास सोमारे यांनी दिली.
खरेदीपैकी ६०% पेमेंट शेतकऱ्यांना दिले
खरेदीपैकी ६० टक्के पेमेंट शासनाकडून प्राप्त झाले असून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. यंदा हरभऱ्याचा हमीभाव बाजारभावापेक्षा जास्त असल्यामुळे एक लाखाच्या वर हरभऱ्याची खरेदी आतापर्यंत झालेली आहे. ११ जूनपर्यंत आणखीन खरेदीची मुदत आहे. त्यामुळे दोन लाख क्विंटलच्या वर खरेदी होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नाफेडकडे हरभरा तेजीत; बाजारभाव कोमात
हरभऱ्याला हमीभाव ५३३५ रुपये प्रति क्विंटल आहे. तर बाजारात पाच हजार रुपयांपर्यंत हरभऱ्याला दर मिळत आहे. बाजारभावापेक्षा हमीभाव केंद्रावर चांगला दर मिळत आहे . त्यामुळे यंदा हमीभाव केंद्राकडेच हरभऱ्याची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. दरम्यान, तूर, मूग, उडीद, सोयाबीन या शेतमालाला बाजारभाव अधिक होता. त्यामुळे प्रस्तुत शेतमालाची विक्री हमीभाव केंद्रावर झाली नाही.
दहा दिवसांत पेमेंट ; ११ जूनपर्यंत केंद्र सुरू राहणार
हमीभाव केंद्रावर हरभरा खरेदी केल्यानंतर आठ ते दहा दिवसांत पेमेंट केले जात आहे. यंदा पेमेंटसाठी वाट पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदी झाली आहे. आणखीन ११ जूनपर्यंत केंद्रे सुरू राहणार आहेत. त्यामुळे खरेदी वाढणार असल्याचे नाफेडच्या वतीने सांगण्यात आले.