शासनाच्या आदेशाला नाफेडचा ‘खो’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 05:09 PM2018-09-27T17:09:05+5:302018-09-27T17:09:39+5:30
- हरी मोकाशे, लातूर
शेतमाल विक्रीत शेतकऱ्यांची लूट होऊ नये म्हणून शासनाने नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, तीन दिवस उलटले तरी नाफेडचे ऑनलाईनचे पोर्टलच बंद आहे. परिणामी, शासनाच्या आदेशाला नाफेडकडून ‘खो’ मिळत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील ६ लाख २१ हजार ६४४ हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला होता. त्यात सर्वाधिक सोयाबीनचा पेरा असून, तो ४ लाख १४ हजार ४८० हेक्टरवर आहे. तुरीचा ९३ हजार २३२, मूग १४ हजार १६६, तर उडीदाचा ११ हजार ५७६ हेक्टरवर पेरा झाला होता. यंदा पावसाने दडी मारल्याने बहुतांश ठिकाणची पिके करपली आहेत. ज्या शेतकºयांनी विहीर, बोअरच्या पाण्यावर पिके जगविली असली तरी उत्पादनाचा उतारा मात्र घटला आहे. सध्या मूग आणि उडीदाच्या राशी सुरू असून, शेतकरी हा शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठेत आणत आहेत.
केंद्र शासनाने मुगाला ६ हजार ९७५ तर उडीदाला ५ हजार ६०० रुपये आधारभूत किंमत जाहीर केली आहे. प्रत्यक्षात बाजारपेठेत मुगाला ४१०० रुपये तर उडीदाला ४१०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. शेतकऱ्यांची ही आर्थिक लूट होऊ नये म्हणून शासनाने चार दिवसांपूर्वी उडीद, मुगाच्या विक्रीसाठी नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शेतकरी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी धावाधाव करीत आहेत. परंतु, नाफेडचे ऑनलाईनचे पोर्टलच बंद असल्याने नोंदणी करावी कोठे? असा सवाल व्यक्त होत आहे.
पोर्टल बंदमुळे अडचण...
मूग, उडीद खरेदीसाठी शेतकºयांनी हमीभाव खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. परंतु, नाफेडचे ऑनलाईनचे पोर्टल बंद आहे. त्यामुळे आम्हीही हतबल झालो आहोत. या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करीत असल्याचे नाफेडचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाय.ई. सुमठाणे यांनी सांगितले.