उदगीरातील नांदेड-बिदर मुख्य रस्त्याला तळ्याचे स्वरूप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:13 AM2021-07-23T04:13:27+5:302021-07-23T04:13:27+5:30
उदगीर : शहरातील नांदेड-बिदर या राज्य मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. या मार्गावरून ये-जा ...
उदगीर : शहरातील नांदेड-बिदर या राज्य मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसह पादचाऱ्यांना कसरत करत पाण्यातून वाट काढावी लागत आहे. यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
उदगीर शहराच्या मध्यवर्ती भागातून नांदेड-बिदर हा राज्यमार्ग गेला आहे. या राज्यमार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उदयगिरी महाविद्यालयापर्यंत अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. उमा चौक, नांदेड नाका व पुढे उदय पेट्रोल पंप या भागातील या मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या भिजपाऊस सुरू असल्याने या रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. यामुळे रहदारीच्या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना कसरत करत पाण्यातून वाट काढावी लागत आहे. मागील महिन्यात संबंधित विभागाकडून मुरूम व सीलकोट टाकून या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र या पावसात ते वाहून गेले असून पुन्हा जैसे थेच परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील मध्यवर्ती भागातून हा वर्दळीचा राज्यमार्ग गेला असल्याने नेहमी या रस्त्यावर वाहनधारकांसह पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. वर्दळीच्या ठिकाणच्याच रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने सामान्य जनता त्रस्त झाली असून संबंधित विभागावर संताप व्यक्त करीत आहे. सदरील राज्यमार्गाची तत्काळ दुरुस्ती करून रस्त्यावर थांबून राहणाऱ्या पाण्याला वाट मोकळी करून द्यावी, अशी मागणी वाहनधारकांसह प्रवासी व शहरातील नागरिकांनी केली आहे.
अंतर्गत रस्त्यावर ही खड्डेच खड्डे...
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावरच पाणी साचत आहे. नाली व ड्रेनेजची अनेक ठिकाणी सोय नाही. मुख्य रस्त्याला तर तळ्याचे स्वरूप आले आहे. यामुळे अनेक अपघात झाले आहेत. तर शहरातील अंतर्गत रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने तत्काळ हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी केली आहे.
पावसामुळे वाढला अपघाताचा धोका...
सध्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यातच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खड्ड्यात पाणी साचत असल्याने पाण्याचा अंदाज येत नाही. परिणामी, दुचाकीचालकांना कसरत करावी लागत आहे. तसेच किरकोळ अपघाताचे प्रमाणही वाढले आहेत. त्यामुळे संभाव्य अपघाताचा धोका लक्षात घेता रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली आहे.