प्रत्येकाला काम देऊन गरीबीमुक्तीवर भर देणाऱ्या उटी बुद्रुक गावास राष्ट्रीय पंचायत पुरस्कार

By हरी मोकाशे | Updated: December 4, 2024 18:56 IST2024-12-04T18:55:30+5:302024-12-04T18:56:07+5:30

ग्रामपंचायतीच्या उल्लेखनीय कार्याबद्दल यापूर्वी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आता येत्या ११ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव होणार आहे.

National Panchayat Award to Ooty Budruk village for emphasis on work for everyone and poverty alleviation | प्रत्येकाला काम देऊन गरीबीमुक्तीवर भर देणाऱ्या उटी बुद्रुक गावास राष्ट्रीय पंचायत पुरस्कार

प्रत्येकाला काम देऊन गरीबीमुक्तीवर भर देणाऱ्या उटी बुद्रुक गावास राष्ट्रीय पंचायत पुरस्कार

लातूर : गावातील एकाही मजुराचे स्थलांतर होऊ नये तसेच रात्री उपाशीपोटी झोपू नये म्हणून औसा तालुक्यातील उटी बु. ग्रामपंचायतीने मग्रारोहयोतून मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून दिले. शिवाय, महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगारास प्रोत्साहन दिले. त्यामुळे गावातील मजूर कुटुंब सधन झाले आहे. त्या कार्याची दखल घेत केंद्र शासनाने उटी बु. ला गरिबीमुक्त आणि उपजीविका (रोजगार) वृद्धीस पोषक गाव म्हणून जाहीर केले आहे.

औसा तालुक्यातील उटी बु. हे गाव ३७९ उंबरठ्यांचे आणि २ हजार ५३ लोकसंख्येचे आहे. गाव नेहमीच विकासाच्या पथावर आहे. त्यामुळे यापूर्वी पाणीदार गाव म्हणून ओळख होती. गावात शेतकऱ्यांपेक्षा शेतमजुरांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मजुरांपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण होत असे. दरम्यान, ग्रामपंचायतीने मग्रारोहयोच्या माध्यमातून २०० पेक्षा अधिक कुटुंबांचे जॉबकार्ड रोजगार उपलब्ध करून दिला.

गावातील छोट्या-छोट्या व्यावसायिकांसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाळे बांधकाम करून नाममात्र दराने ते दिले. त्यामुळे गावातील अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणास मदत झाली. संसार हा दोन चाकांवर अवलंबून असतो. घरातील कर्त्याबरोबर घर कारभारणीचाही हातभार लागावा म्हणून बचत गटाची वीण अधिक घट्ट करीत त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले. त्यामुळे महिलांना विविध कुटीर उद्योगातून स्वयंरोजगार मिळत आहे.

कडाक्याच्या थंडीतही अख्ख्या गावास गरम पाणी...
गावातील प्रत्येक कुटुंबास अंघोळीसाठी गरम पाणी मिळावे म्हणून ग्रामपंचायतीने गावातील शासकीय इमारतीवर १० सोलर वाॅटर हिटर बसविले आहेत. त्याद्वारे मोफत गरम पाणी मिळत आहे. शंभर टक्के पाणीपट्टी, घरपट्टी भरणाऱ्यांना नाममात्र दरात दळण दळून दिले जाते. संपूर्ण गावास नि:शुल्क शुद्ध पाणीपुरवठा केला जातो.

गावच्या सुरक्षेसाठी तिसरा डोळा...
संपूर्ण गावात पक्के रस्ते आहेत. गावच्या सुरक्षेसाठी ३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीत सुसज्ज संगणक कक्ष आहे. ग्रामपंचायतीच्या उल्लेखनीय कार्याबद्दल यापूर्वी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आता येत्या ११ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव होणार आहे.

रोजगाराभिमुख कार्य...
केंद्र शासनाच्या मग्रारोहयोतून मजुरांच्या हाताला काम देण्याबरोबर कौशल्य प्रशिक्षणातून गोरगरिबांचे आर्थिक जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितींकडून रोजगार उपलब्ध करून देण्यावर विशेष भर आहे. त्याचा दुर्बल घटकांना लाभ होत आहे.
- अनमोल सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.

उत्कृष्ट कार्याची पावती...
उटी बु. गाव सातत्याने प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. संपूर्ण गावाने सातत्याने विकासासाठी कष्ट घेतल्याने हा गौरव होणार आहे. त्यांच्या कामाची ही पावती आहे. इतर गावांनीही आदर्श घ्यावा.
- बाळासाहेब वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.

गावकऱ्यांचा पुढाकार...
गावाने नेहमीच विकासकामांवर भर दिला आहे. माजी सरपंच ॲड. भालचंद्र पाटील व सदस्य आणि गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे हे यश मिळाले आहे. गावची आणखीन प्रगती साधू.
- महेश जगताप, ग्रामपंचायत अधिकारी.

Web Title: National Panchayat Award to Ooty Budruk village for emphasis on work for everyone and poverty alleviation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.