देवणी बाजार समिती प्रशासकीय मंडळावर राष्ट्रवादीची छाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:24 AM2021-09-04T04:24:45+5:302021-09-04T04:24:45+5:30
देवणी : देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासकीय संचालक मंडळ हे काँग्रेसचे ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, ...
देवणी : देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासकीय संचालक मंडळ हे काँग्रेसचे ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट प्रमुखांपर्यंत धाव घेऊन ग-हाणे मांडले. त्यामुळे प्रशासकीय संचालक मंडळाची संभाव्य यादी अखेर बदलण्यात आली. जाहीर करण्यात आलेल्या मंडळाच्या यादीत राष्ट्रवादीने ७ जागा मिळवित आपली छाप निर्माण केली आहे.
१० वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीवर सतत प्रशासकीय मंडळाचा कारभार राहिला आहे. दहा वर्षांपूर्वी काँग्रेसचे तर मागील काळात भाजपाचे प्रशासकीय मंडळ राहिले आहे. या मंडळाची मुदत संपुष्टात आल्याने नवीन महाविकास आघाडीचे प्रशासकीय मंडळ येणे अपेक्षित होते. मात्र, काँग्रेसने आघाडीतील राष्ट्रवादी, शिवसेना या मित्र पक्षांना पुसटशीही माहिती होऊ न देता काँग्रेस प्रणित प्रशासकीय मंडळाच्या यादीचा प्रस्ताव शिफारशींसह पणन महासंघाकडे पाठविला होता. विशेष म्हणजे, यात काँग्रेसच्या जुन्या मोह-यांनाही स्थान देण्यात आले नव्हते.
दरम्यान, प्रस्तावास अंतिम मंजुरी मिळण्यापूर्वी मित्र पक्षांना चाहूल लागली आणि राष्ट्रवादीने काँग्रेसकडून आपल्यावर राजकीय अन्याय होत असल्याची कैफियत राष्ट्रवादी प्रमुखांपर्यंत मांडली. तसेच काँग्रेसमधील जुन्या जाणकारांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. तेव्हा राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी आघाडी धर्माचा अर्थ सांगत काँग्रेसच्या प्रस्तावित यादीला खो दिला आणि मुख्य प्रशासक म्हणून राष्ट्रवादीच्या निष्ठावंताची वर्णी लावली. याशिवाय, निम्म्या जागा आपल्या संचालकांच्या ताब्यात घेतल्या आहेत.
राष्ट्रवादीच्या धोरणामुळे तालुक्यात काँग्रेसची गोची झाली आहे. कारण शेवटच्या टप्प्यात यादी बदलली आहे. दरम्यान, नवीन प्रशासकीय मंडळावरून काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. योग्य कार्यकर्त्यांची वर्णी न लागल्याने आणि देवणी शहरातील एकाही कार्यकर्त्यास संधी न मिळाल्याने नाराजीचा सूर ऐकावयास मिळत आहे. त्यामुळे आगामी नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत प्रशासकीय मंडळाची डोकेदुखी वाढणार आहे.
शांतवीर कन्नाडे मुख्य प्रशासक...
देवणी बाजार समितीच्या मुख्य प्रशासकपदी शांतवीर कन्नाडे तर प्रशासक म्हणून अनिल कांबळे, आमेल येणगे, शिवाजीराव शेंडगे, अनिल रोट्टे, दिलीप पाटील, बालाजी बोबडे, मलबा घोणसे, गजानन भोपणीकर, ताहेरपाशा खुर्शीद पटेल, पांडुरंग बिरादार, मकबुल रमजानखाँ पठाण, विश्वनाथ धनेगावे, लक्ष्मण हुडे, डॉ. अनिल इंगोले यांची निवड झाली आहे. नूतन प्रशासक मंडळाची यादी जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी जाहीर केली आहे.
राष्ट्रवादीचे ७ संचालक...
देवणी बाजार समितीवर १५ संचालकांचे प्रशासक मंडळ आहे. त्यात राष्ट्रवादीचे ७, काँग्रेस ६ आणि शिवसेनेचे २ आहेत. हे संचालक मंडळ सहा महिन्यांचे आहे.