नीट प्रकरण : डीएडचे वर्गमित्र आणि आराेपींची साखळी! दाेघांच्या सहभागातून झाले आर्थिक व्यवहार
By राजकुमार जोंधळे | Published: June 27, 2024 05:30 AM2024-06-27T05:30:04+5:302024-06-27T05:31:24+5:30
नीट प्रकरण : दाेघांच्या सहभागातून झाले आर्थिक व्यवहार
लातूर : नीट प्रकरणात अटकेत असलेला आराेपी मुख्याध्यापक जलीलखाॅ पठाण आणि शिक्षक संजय जाधव याचा भाचा डीएडचे वर्गमित्र असून, भाच्याने मामा संजयची लातुरात ओळख करून दिली. याच ओळखीतून नीट गुणवाढ संदर्भातील आर्थिक व्यवहार सुरू झाला. सध्या दाेघांची पाेलिस काेठडीत पाेलिस चाैकशी करत आहेत. दरराेजच्या चाैकशीतून वेगवेगळी माहिती समाेर येत आहे.
‘नीट’मधील गुणवाढीसाठी जलीलखाॅ पठाण याच्या हातावर १० पालकांचा व्यवहार झाला असून, त्यांनी प्रवेशपत्र आणि ॲडव्हान्स म्हणून पैसे दिल्याची माहितीही चाैकशीतून समाेर आली आहे. तर शिक्षक संजय जाधव याच्या माेबाइल डिटेल्समधून १२ जणांची यादी पाेलिसांच्या हाती लागल्याची माहिती बाहेर आली आहे. जवळपास काेट्यवधींच्या घरात जाणारे व्यवहार दाेघांच्या मध्यस्थीने झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० वर्ष केली सेवा...
२००३ मध्ये काेकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात संजय जाधव याची नियुक्ती झाली हाेती. दरम्यान, २००३ ते २०२३ या काळात त्याने तेथे शिक्षक म्हणून सेवा केली आहे. गावाकडे येण्यासाठी त्याने आंतरजिल्हा बदलीसाठी प्रयत्न केला. मात्र, लातूरऐवजी नजीकचा जिल्हा साेलापूर येथे बदली झाली.
पाेलिस काेठडीत दाेघांची कसून चाैकशी...
लातुरातील शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर दाेघांना एकापाठाेपाठ अटक करण्यात आली. आता त्यांची वेगवेगळ्या पाेलिस पथकाकडून कसून चाैकशी केली जात आहे. आराेपींनी दिलेल्या कबुली जबाबात अनेक किस्से आता समाेर येत आहेत.
इरण्णापर्यंतच दाेघांची ओळख..?
नीट गुणवाढसंदर्भात पाेलिसांनी आराेपी मुख्याध्यापक पठाण आणि शिक्षक जाधव याचे धागेदाेरे इरण्णा याच्याशिवाय आणखी काेणापर्यंत आहेत का? याचीही चाैकशी केली. मात्र, इरण्णा काेनगलवार याच्याशिवाय इतर काेणाशीही ओळख नसल्याचे समाेर आले आहे. इरण्णा आणि दाेघांची ओळख ही एप्रिलमध्येच झाल्याचेही उघड झाले आहे.
आराेपींच्या साखळीने शिक्षकांना दाखविले आमिष...
आराेपी मुख्याध्यापक, शिक्षकाच्या साखळीने नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षक पालकांनाच हेरण्याचा प्रयत्न केल्याचे समाेर आले असून, काही शिक्षकांना गुणवाढीसंदर्भातील आमिष दाखवत गंडविल्याची माहितीही आता बाहेर आली आहे. आपल्याच शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांना आराेपीच्या साखळीने गळाला लावले आहे.
चाैकशीसाठी नांदेडचे एटीएस पथक लातुरात...
नीट प्रकरणात लातूर पाेलिसांच्या अटकेत असलेले आराेपी मुख्याध्यापक जलीलखाॅ पठाण आणि शिक्षक संजय जाधव याच्या चाैकशीसाठी नांदेड येथील एटीएसचे पथक बुधवारी दिवसभर लातुरात ठाण मांडून हाेते. दरम्यान, त्यांनी दाेघांचीही दिवसभरात कसून चाैकशी केली आहे. आराेपींचे इतर आराेपींशी कनेक्शन आहे का? याचीही पडताळणी केली जात आहे. स्थानिक पाेलिस पथक, एटीएस अशा स्वतंत्र पथकाकडून सध्याला चाैकशी केली जात आहे.