वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहाराचे नियोजन गरजेचे : पवन लड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 11:33 AM2018-12-07T11:33:09+5:302018-12-07T11:35:44+5:30
आजार टाळण्यासाठी व वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे़
लातूर : सद्य परिस्थितीमध्ये बदललेल्या व चुकीच्या आहारामुळे विविध शारिरिक आजारांची उत्पत्ती होत आहे. प्रत्येक घरामध्ये वाढलेल्या वजनाशी संबंधीत रुग्ण आढळुन येत आहेत. असे आजार टाळण्यासाठी व वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे़ असा सल्ला डॉ.पवन लड्डा यांनी दिला.
वजन व आहार यावर माहिती देताना डॉ. लड्डा यांनी सांगितले की, वजन कमी करण्यासाठी आहार कमी व व्यायाम जास्त हा नियम काटेकोरपणे लागू होतो. मात्र आहार कमी म्हणजे किती व कोणता घ्यावा, आहार नियंत्रण कसे करावे, व्यायाम कसा करावा, योग्य व्यायाम कोणता याबद्दल द्विधा मन:स्थिती असते. शरिराला गरज आहे तितकाच आहार घेणे आवश्यक आहे़ त्यात आग्रहाचे जेवण टाळणे, भुक नसताना जेवण करणे टाळणे, पूर्वी खाल्लेले अन्न पचन झाले नसताना फक्त वेळ झाली म्हणुन खाणे टाळणे म्हणजेच आहारावर नियंत्रण करणे असे होते़
पूर्वी मेहनतीची कामे खुप असायची. भरपुर कष्ट केल्यानंतर पोट भरुन खाल्ले तरीही वजन वाढत नव्हते. आता शारिरिक कष्ट अत्यंत कमी झाले आहे. चालणे फिरणे कमी झाले आहे, अंग मेहनत नाहीशी झाली आहे, लोकांना मेहनत किंवा धावपळ करुन घाम कधी आला होता हे नीट आठवत नाही़ यामुळे पोटभरून खाणे ही संकल्पना कालबाह्य होणे गरजेचे आहे. एका वेळेस फक्त भाकरी-वरण, दुसरे काहीच नाही, एका वेळेस फक्त चपाती भाजी दुसरे काही नाही, एका वेळेस फक्त कोशींबीर किंवा कोशींबीर- चपाती, पुढच्या वेळेस फक्त भात-वरण, याप्रमाणे खिचडी-कढी, कडधान्यांची उसळ, फळे, फळांचा रस किंवा पालेभाज्यांचे सुप्स, चुरमुरयाचा चिवडा किंवा भेळ, सुकामेवा, ताक किंवा मठ्ठा, मुगाची किंवा तुरीची डाळ याप्रमाणे आठवड्याचे सकाळ-दुपार-संध्याकाळ असे नियोजन करायचे. आहार बदल म्हणजे दररोजच्या आहारातील सातत्य टाळुन प्रत्येक वेळी नवीन पदार्थ खाणे अपेक्षित होय.
वजन कमी करण्यासाठी व्यायाम करताना आपल्याला सहज जमेल, सोसवेल, नेहमी करता येईल असा व्यायाम करावा. ज्या व्यायामामुळे प्रभावीरित्या वजन कमी होते असा व्यायाम करावा. व्यायामाला आपल्या दैनंदिनीमध्ये सर्वात महत्वाचे स्थान द्यावे. व्यायाम करताना घाम येणे महत्वाचे, व्यायाम करताना मुद्दाम दम लागणे महत्वाचे, श्वासाचा वेग वाढणे महत्वाचे, हृदयाचे ठोके वाढणे महत्वाचे. एकंदरीत आपण करीत असलेल्या व्यायामाने एका निश्चित प्रमाणात कॅलरीज बर्न होणे आवश्यक असल्याचेही डॉ. पवन लड्डा म्हणाले.