नीट प्रकरण : मोबाइलमधील ६ हजार मेसेजचा अद्यापही होईना उलगडा... आरोपी गंगाधरअप्पाचा आयसीयूमध्ये मुक्काम
By राजकुमार जोंधळे | Published: July 16, 2024 09:21 AM2024-07-16T09:21:11+5:302024-07-16T09:27:26+5:30
‘नीट’मध्ये गुणवाढीचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील पालक-विद्यार्थ्यांकडून पैसे उकळल्याचे पुरावे सीबीआयच्या हाती लागले. याच पुराव्याच्या आधारे एन. गंगाधरअप्पाला आंध्र प्रदेशातून अटक केली.
राजकुमार जोंधळे
लातूर : ‘नीट’ (नॅशनल एलिजिबिलिटी एंटरन्स टेस्ट)मध्ये गुणवाढीचे आमिष दाखवत फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अटक केलेला म्होरक्या एन. गंगाधरअप्पाची चौकशी करण्यासाठी सीबीआयने सहा दिवसांची कोठडी न्यायालयाकडे मागितली होती. परंतु, सहा दिवसांच्या कोठडीत दोन दिवसच चौकशी करता आली असून, सहा हजार मेसेज व ‘कोडवर्ड’मधील नावाचा, एजंटचा उलगडा झाला नाही, असे सीबीआयने न्यायालयाला सांगितले.
‘नीट’मध्ये गुणवाढीचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील पालक-विद्यार्थ्यांकडून पैसे उकळल्याचे पुरावे सीबीआयच्या हाती लागले. याच पुराव्याच्या आधारे एन. गंगाधरअप्पाला आंध्र प्रदेशातून अटक केली. लातुरातील शिक्षक संजय जाधव, जलीलखाँ पठाण यांच्या चौकशीत गंगाधरअप्पासोबत मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचे उघड झाले. दोघांच्या चौकशीतून गंगाधरअप्पाचे ‘लोकेशन ट्रेस’ झाले आणि गंगाधरअप्पा सीबीआयच्या जाळ्यात अडकला. त्याला हृदयरोग, मधुमेह असल्याने त्याची प्रकृती बिघडली. आता लातुरात त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
बंगळुरूत शस्त्रक्रिया
बंगळुरू येथील रमय्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे २०२२ मध्ये आरोपी एन. गंगाधरअप्पावर हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याची नियमित तपासणीही येथेच केली जात आहे. त्यासाठी हृदयरोग तज्ज्ञांकडून उपचार करण्यात यावा, अशी मागणी गंगाधारअप्पाच्या वकिलाने लातूर न्यायालयाकडे केली आहे.
फोकस इरण्णावर...
इरण्णा कोनगलवार (मूळ रा. देगलूर, जि. नांदेड) याने लातूर जिल्हा विशेष न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, त्याच्या अर्जावर गुरुवार, १८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. मात्र, सीबीआयने न्यायालयात आरोपीचा ताबा मिळावा, म्हणून अर्ज केला आहे. आता सीबीआय चौकशीचा फोकस इरण्णावर राहणार असल्याचे दिसून येत आहे.
गंगाधरला चार दिवस न्यायालयीन कोठडी
सीबीआयच्या कोठडीत असलेल्या एन. गंगाधरअप्पा याला सोमवारी दुपारी लातूर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश एम. एन. चव्हाण यांनी त्याला १९ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सीबीआयची बाजू
एन. गंगाधरअप्पा याने सहा दिवसांच्या कोठडीत तपासाला फारसा प्रतिसाद दिला नाही.
तो सहा दिवसांत चार दिवस आजारी पडल्याने आम्ही त्याला लातुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
सध्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात यावे, अशी विनंती सीबीआयचे डीवायएसपी कुणाल अरोरा यांनी न्यायालयाला केली.
गंगाधरअप्पाच्या वकिलाची बाजू
एन. गंगाधरअप्पा याचा तपास यंत्रणांनी आधीच मोबाइल जप्त केलेला आहे.
जप्त मोबाइल व इतर मुद्देमालाच्या आधारे सीबीआयला तपास करता येणार आहे, सीबीआय कोठडीची गरज नाही.
आरोपीला हृदयरोग, मधुमेहाचा आजार असून, हृदयरोग तज्ज्ञांच्या उपचाराची गरज आहे, अशी विनंती ॲड. गौस शेख यांनी न्यायालयास केली.