नीट प्रकरण :फसवणूक झालेल्या पालकांचा सीबीआय पथक घेणार शाेध..!
By राजकुमार जोंधळे | Published: July 9, 2024 08:23 AM2024-07-09T08:23:36+5:302024-07-09T08:23:44+5:30
यादीतील २२ जणांचे जबाब नाेंदविणार...
लातूर : ‘नीट’मध्ये (नॅशनल एलिजीबिलीटी एन्टरन्स टेस्ट) गुणवाढीचे आमिष दाखवून लातूर, बीडसह इतर जिल्ह्यांतील पालक-विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार तपास यंत्रणांच्या चाैकशीत उघड झाला आहे. फसवणूक झालेल्या पालक-विद्यार्थ्यांचा लातुरात ठाण मांडलेल्या सीबीआय पथकाकडून शाेध घेतला जाणार आहे. आतापर्यंत दहा पालक-विद्यार्थ्यांचे जबाब नाेंदविण्यात आले आहेत.
नीटमध्ये गुणवाढीचे आमिष दाखवून प्रवेशपत्र आणि ॲडव्हान्स ५० हजार घेतल्याचा प्रकार लातूर पाेलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात समाेर आला. दहापैकी सात ते आठ विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ही बिहार राज्यातील परीक्षा केंद्रावरील असल्याचे आढळून आले. अटकेतील दाेघांच्या चाैकशीत पहिल्या टप्प्यात दहाजणांची यादी स्थानिक तपास यंत्रणांच्या हाती लागली. दुसऱ्या टप्प्यात १८, तर तिसऱ्या टप्प्यात ४ जणांची यादी सीबीआयच्या हाती लागली. आतापर्यंत एकूण ३२ पालक-विद्यार्थ्यांची नावे समाेर आली असून, त्यांची लातूर मुक्कामी असलेल्या सीबीआयकडून चाैकशी केली जाणार आहे.
इरण्णाचा सीबीआयला गुंगारा...
लातुरात दाखल गुन्ह्यातील चाैघांपैकी दिल्लीतील गंगाधरला बंगळुरु सीबीआयने ताब्यात घेतले असून, इरण्णा काेनगलवार सीबीआयला गुंगारा देत पसार आहे. बंगळुरु येथून गंगाधरला लातुरातील गुन्ह्यात साेमवारी आणण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली हाेती. मात्र, त्याला साेमवारी आणण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले.
बंगळुरुतील मुक्काम वाढला...
लातूरसह इतर राज्यांतील गुन्ह्यात तपास यंत्रणांच्या रडारवर असलेला गंगाधर सध्या बंगळुरु येथील सीबीआयच्या काेठडीत आहे. त्याची कसून चाैकशी सुरू आहे. सध्या त्याचा बंगळुरुतील मुक्काम वाढला असून, तेथील तपासानंतर त्याला लातुरातील गुन्ह्यात सीबीआय चाैकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार आहे, अशी माहिती आहे.
गंगाधरच्या चौकशीत अनेक एजंटांचा शोध...
दिल्लीतील नाेएडात वास्तव्याला असलेला गंगाधर अन् लातुरात दाेघा शिक्षकांचा मध्यस्थ म्हणून समाेर आलेला इरण्णा काेनगलवारचा सीबीआयला अद्याप सुगावा लागला नाही. बंगळुरु येथील चाैकशीत गंगाधरच्या संपर्कात आलेल्या इतर अनेक एजंटांचा शाेध घेतला जात आहे. मराठवाड्यातील लातूर, बीडसह इतर जिल्ह्यांत त्याने एजंट, सबएजंट नेमले आहेत का? याचेही धागेदाेरे हाती लागतील का, हे पाहिले जात आहे.
लातूर-बंगळरु सीबीआय करणार ‘नॉनस्टॉप’ प्रवास...
लातुरातील गुन्ह्यात बंगळुरु येथून गंगाधरला ताब्यात घेण्यासाठी लातूर ते बंगळुरु असा नाॅनस्टाॅप प्रवास सीबीआय पथक करणार असल्याची माहिती मिळत आहे. येत्या दाेन दिवसांत त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. लातुरातील चाैकशीमध्ये गंगाधारचा सहभाग, गुन्ह्याची व्याप्ती, कारमाम्यांचा उलगडा हाेणार आहे.