नीट प्रकरणाचा 'सीबीआय'कडून तपास, इरण्णाच्या घराची इन-कॅमेरा झडती
By राजकुमार जोंधळे | Published: July 5, 2024 01:03 AM2024-07-05T01:03:41+5:302024-07-05T01:04:12+5:30
...दरम्यान, तपास यंत्रणांची पथके आराेपी इरण्णाच्या मागावर असून, अद्यापि ताे हाती लागलेला नाही.
लातूर : नीटमध्ये (नॅशनल एलिजीबिलीटी एन्टरन्स टेस्ट) गुणवाढीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या काेठडीतील दाेन्ही आराेपी आणि दिल्ली कनेक्शनचा मध्यस्थ इरण्णा काेनगलवार याच्या घराची ‘सीबीआय’ने इन-कॅमेरा झडती घेतली. दरम्यान, तपास यंत्रणांची पथके आराेपी इरण्णाच्या मागावर असून, अद्यापि ताे हाती लागलेला नाही.
आराेपी मुख्याध्यापक जलीलखाॅ पठाण, शिक्षक संजय जाधव सध्या सीबीआय काेठडीत आहेत, तर गुन्हा दाखल झाल्यापासून पसार असलेल्या इरण्णाच्या घरातून काही सुगावा लागताे का, याचा अंदाज सीबीआयने घेतला. मात्र पथकाच्या हाती नेमके काय लागले, याची माहिती समाेर आलेली नाही.
पाेलिस, एटीएसच्या अहवालाची पडताळणी...
गुन्ह्याचा तपास एटीएस, त्यानंतर स्थानिक पाेलिसांनी केला. प्राथमिक चाैकशीनंतर एटीएसने तक्रार दिली हाेती. चाैकशीत जप्त माेबाइल, काही कागदपत्रांच्या आधारे पाेलिसांनी तातडीने दाेघांना अटक केली. आठ दिवसांत स्थानिक यंत्रणांनी या गुन्ह्याचा तपास केला असून, त्यात समाेर आलेले तथ्य आणि प्रत्येक बारकावे सीबीआय पडताळून पाहत आहे. सीबीआयने चाैकशीदरम्यान दाेघांना चांगलाच घाम फाेडला असून, चार दिवसांपासून नाॅनस्टाॅप चाैकशी सुरू आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या पालकांना चाैकशीला बाेलविले जाणार आहे.
फॉरेन्सिक लॅबमध्ये मोबाइलची तपासणी...
नांदेड एटीएसच्या छाप्यात जलीलखाॅ पठाण, संजय जाधव आणि इरण्णा काेनगलवार यांचे माेबाइल जप्त करण्यात आले हाेते. आता हे माेबाइल सीबीआयने ताब्यात घेतले असून, त्यांची फाॅरेन्सिक लॅबमध्ये तपासणी केली जात आहे. अहवालानंतर या गुन्ह्यासंदर्भात आणखी काही खुलासे हाेतील, अशी अपेक्षा तपास यंत्रणेला आहे.
‘त्या’ तिघा संशयितांची चाैकशी...
पाेलिस काेठडीतील चाैकशीत इतर तिघा संशयितांची नावे समाेर आली आहेत. त्याचा उल्लेख सीबीआयच्या वकिलांनी न्यायालात युक्तिवादाच्या दरम्यान केला हाेता. आता त्या तिघांचा या प्रकरणात किती सहभाग आहे, याची चाैकशी सीबीआयकडून केली जात आहे.
परराज्यात परीक्षा देणारे किती विद्यार्थी...
लातुरात तयारी करणारे आणि स्वजिल्ह्यात केंद्र निवडून परीक्षा देणारे राज्यातील प्रामाणिक विद्यार्थी हजाराेंमध्ये आहेत. मात्र, वेगवेगळ्या जिल्ह्यातून लातुरात आलेल्या काही माेजक्या विद्यार्थ्यांनी परराज्यातील परीक्षा केंद्र का निवडले, हा कळीचा मुद्दा आहे. सद्य:स्थितीत २८ जणांची यादी समाेर आली. त्यात दहाजणांचे प्रवेशपत्र यंत्रणेच्या ताब्यात आहेत. परिणामी, गडबड करणाऱ्यांना कायमचा धडा शिकवा, अशी भूमिका लातुरातील हजाराे विद्यार्थी-पालकांनी मांडली आहे. दरम्यान, बिहार, गुजरात, कर्नाटक राज्यातील केंद्र निवडणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुण यंत्रणा तपासत आहे.