NEET Exam Paper Leak: सीबीआय करणार आरोपींच्या 'बेहिशोबी' मालमत्तांचा हिशोब !
By राजकुमार जोंधळे | Published: July 25, 2024 07:52 PM2024-07-25T19:52:33+5:302024-07-25T19:53:05+5:30
गुणवाढीच्या आमिषातून पालक-विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या आराेपींनी राेख आणि बॅक व्यवहारातून पैशाची उलाढाल केली आहे.
लातूर : ‘नीट’मध्ये गुणवाढीचे आमिष दाखवून पालक-विद्यार्थ्यांची माेठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचे पुरावे तपासामध्ये समाेर आले आहे. यातून झालेल्या आर्थिक उलाढालीच्या आकड्यांचा शाेध आता ‘सीबीआय’ घेत आहे. या पैशाची गुंतवणूक प्लाॅट, फ्लॅट आणि जमीन खरेदीमध्ये केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. आता या ‘बेहिशाेबी’ मालमतांचा हिशाेब सीबीआय करणार आहे.
नीट गुणवाढीच्या फसवणूक प्रकरणात लातुरात दाखल गुन्ह्यातील चाैघा आराेपींनी टाेकन म्हणून प्रति पालकांकडून ५० हजारांची रक्कम उकळली. शिवाय, काम झाल्यानंतर ५ ते १५ लाख रुपये देण्याची बाेलणी केली. याबाबतची कबुली त्यांनी सीबीआय चाैकशीत दिली आहे. या माध्यमातून अनेक पालक-विद्यार्थ्यांना लाखाे रुपयांना फसवल्याचा प्रकार समाेर आला. न्यायालययीन काेठडीतील तिघा आराेपींसह पसार झालेल्या इरण्णा काेनगलवार याच्यासाेबत माेठी आर्थिक उलाढाल झाली असून, याच उलाढालीचा ताळेबंद सीबीआयकडून तपासला जात आहे. चारपैकी तीन आराेपी सध्या न्यायालयीन काेठडीत आहेत.
घर, शेती खरेदीबराेबरच प्लाॅटिंगमध्ये पैशाचा वापर?
गुणवाढीच्या आमिषातून पालक-विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या आराेपींनी राेख आणि बॅक व्यवहारातून पैशाची उलाढाल केली आहे. स्वत:सह नजीकच्या नातेवाईकांच्या नावाने बॅक खाते काढून पैशांची देवाण-घेवाण केल्याचे समाेर आले आहे. आता या आर्थिक व्यवहाराचाही तपास सीबीआय करत आहे. आराेपींनी घर, शेती, प्लाॅटिंगमध्ये हा पैसा गुंतविल्याचा संशय आहे. त्यानुसार स्थावर व जंगम मालमत्तांची चाैकशी केली जात आहे.
गैरमार्गाची संपत्ती आता सीबीआयच्या रडारवर !
लातुरातील दाेन शिक्षक, म्हाेरक्या एन. गंगाधरअप्पा याचे मूळगाव आंध्र प्रदेशातील हिंदूपुरम (जि. सत्यसाई) आहे. या गावी सीबीआयचे पथक धडकले असून, गैरमार्गाने जमविलेल्या संपत्तीचा शाेध घेतला जात आहे. उलाढालीच्या पैशातून बेहिशाेबी मालमत्ता जमविल्याचा संशय आहे. आराेपींकडे ज्ञात स्त्राेपेक्षा अधिकची संपत्ती निघेल, असा सीबीआयला संशय आहे. आता बेहिशाेबी मालमत्ता सीबीआय रडारवर आहे.
फाॅरेन्सिक लॅबचा अहवाल;माेबाईल मेसेजचे विश्लेषण...
एटीएस, स्थानिक पाेलिस आणि सीबीआयच्या चाैकशीत आराेपींचे काही माेबाईल जप्त केले आहेत. म्हाेरक्या एन. गंगाधरअप्पा याच्या माेबाईलमधून केलेल्या सहा हजार मेसेजचे विश्लेषण अजूनही सुरुच आहे. या माेबाईलची तपासणी ‘फाॅरेन्सिक लॅब’मध्ये केली जात आहे. शिवाय, सायबर क्राईम शाखेचीही मदत घेतली जात असून, यातून अनेक धागेदाेरे हाती लागतील, असा विश्वास तपास यंत्रणांना आहे.