NEET Exam Scam: तिघांचा जामीन लातूर न्यायालयाने फेटाळला, चाैथा आराेपी अद्यापही पसार
By राजकुमार जोंधळे | Published: September 10, 2024 11:36 AM2024-09-10T11:36:00+5:302024-09-10T11:36:10+5:30
‘नीट’मध्ये गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून पालक-विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी लातुरात शिवाजीनगर ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला हाेता.
लातूर : ‘नीट’प्रकरणी न्यायालयीन काेठडीत असलेल्या तिघांचा जामीन लातूर न्यायालयाने साेमवारी फेटाळला. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, आराेपींना जामीन देता येणार नाही, असे स्पष्टीकरण न्यायालयाने दिले आहे.
‘नीट’मध्ये गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून पालक-विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी लातुरात शिवाजीनगर ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला हाेता. दरम्यान, सीबीआयने जुलै महिन्यात म्होरक्या एन. गंगाधरअप्पा (रा. आंध्र प्रदेश) आणि संजय जाधव, जलील खाँ पठाण (रा. लातूर) याला अटक केली. चौथा आरोपी इरण्णा मष्णाजी कोनगलवार (रा. देगलूर, जि. नांदेड) अद्याप सीबीआयच्या हाती लागला नाही. त्याचा जामीन लातूर जिल्हा विशेष न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला. त्याने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली असून, सुनावणी सुरू आहे. लातूर कारागृहात असलेल्या एन. गंगाधरअप्पा, संजय जाधव, जलील खाँ पठाण याने वकिलामार्फत लातूर न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला हाेता. सुनावणीअंती न्यायालयाने साेमवारी तिघांचाही जामीन फेटाळला.
आरोपी म्हणाले, एकाही पालकाची फसवणूक नाही...
आरोपी म्हणतात, या व्यवहारात त्यांना कसलाही आर्थिक फायदा झाला नाही. कोणत्याही पालकाने फसवणूक झाली म्हणून तक्रार दिली नाही. पालकाची तक्रार नसल्याने सरकार पक्षाच्या वतीने ‘एटीएस’ला तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. संजय जाधव यांच्या वकिलाने युक्तिवाद केला, त्यांनी सर्व पैसे पालकांना परत केले. एन. गंगाधरअप्पा म्हणताे, गुन्ह्याशी कसलाही संबंध नाही. तर जलील खाँ पठाण याचे म्हणणे होते, मी आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक आहे. या नीट घोटाळ्यात सहभागी नाही.
सीबीआय म्हणते, सहभागाचे पुरावे...
सीबीआयचे वकील मंगेश महिंद्रकर यांनी युक्तिवाद केला. यातील सर्व आरोपींचा एकमेकांशी संपर्क होता. त्यांनी सर्व पालकांना भेटून ‘नीट’ परीक्षेत गुण वाढवून देण्याचे काम करतो म्हणून ४० लाखांचा प्रति विद्यार्थ्यांमागे करार केला. अंदाजे प्रति विद्यार्थी दहा लाख रुपये घेतले. यात १६ विद्यार्थी निष्पन्न झाले. काही रक्कम रोख स्वरूपात घेतली, तर काही रक्कम नेट बँकिंगच्या माध्यमातून घेतली. सर्व आरोपींचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला असून, त्यांनी पैसे घेतल्याचे उघड झाले आहे. आराेपींविराेधात भरपूर पुरावे उपलब्ध आहेत. त्यांना जामीन देऊ नये.