परीक्षा ‘नीट’; मात्र वाहतूक वेडीवाकडी..!

By राजकुमार जोंधळे | Published: May 7, 2023 10:11 PM2023-05-07T22:11:53+5:302023-05-07T22:14:31+5:30

पाेलिसांची कसरत : वाहतूक काेंडीने पालक-विद्यार्थी त्रस्त...

neet examination and major traffic jam in latur | परीक्षा ‘नीट’; मात्र वाहतूक वेडीवाकडी..!

परीक्षा ‘नीट’; मात्र वाहतूक वेडीवाकडी..!

googlenewsNext

राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरासह जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर आणि औसा तालुक्यांतील एकूण ५६ केंद्रांवर रविवारी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी परीक्षा (नीट) घेण्यात आली. दरम्यान, या परीक्षेला तब्बल २५ हजार ६०० विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. परीक्षा केंद्रावर पाेहोचण्यासाठी सकाळपासूनच प्रमुख मार्गांवर वाहनांची ताेबा गर्दी झाली हाेती. परिणामी, या वाहतूक काेंडीतून मार्ग काढत पालक-विद्यार्थी कसेबसे परीक्षा केंद्रावर पाेहोचले. ‘नीट’च्या परीक्षेला वाहतूक मात्र वेडीवाकडी असल्याने पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागाला.

नीट परीक्षेसाठी लातुरात जवळपास ५० केंद्रांची स्थापना करण्यात आली हाेती; तर उर्वरित सहा केंद्रे ही जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर आणि औसा तालुक्यांत हाेती. महाराष्ट्राच्या कानाकाेपऱ्यातून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी लातुरात आले आहेत. परीक्षा केंद्रावर पाेहोचण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करण्यात आला. मुलांना परीक्षा केंद्रावर साेडण्यासाठी बहुतांश पालकांनी चारचाकी वाहनांचा वापर केल्याने वाहतुकीचा एकच खाेळंबा झाला. पाेलिसांना वाहतुकीला शिस्त लावताना माेठी कसरत करावी लागली.

वाहतूक कोंडीने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दुचाकीवरून समारंभस्थळी...

रविवारी लातूर शहरात धर्मादाय विभागाच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता. त्यासाठी राज्याचे तत्कालीन धर्मादाय आयुक्त आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे याच वाहतूक कोंडीदरम्यान लातुरात होते. नवीन रेणापूर नाका ते नवीन नांदेड नाका मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने तासभर उशीर होईल, हे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी न्यायमूर्ती डिगे दुचाकीवरूनच समारंभस्थळी पोहोचले. कित्येक विद्यार्थी, पालकही चारचाकी वाहन सोडून रस्त्यावर चालत होते; तर न्यायमूर्तींनाही दुचाकीवरूनच जावे लागले.

परीक्षा केंद्राबाहेर वाहनांचीच गर्दी...

लातूर शहरातील परीक्षा केंद्राबाहेर पालक आणि वाहनांची एकच गर्दी दिसून आली. यातून मार्ग काढणेही महाकठीण झाले हाेते. अनेक वाहने परीक्षा केंद्राकडे येत हाेती; तर काही वाहने परीक्षा केंद्रावरून परत फिरत हाेती. वाहनधारकांच्या बेशिस्तपणामुळे वाहतुकीचा एकाच गाेंधळ उडाला. दयानंद गेट परिसरात जवळपास दाेन तास वाहतूक ठप्प झाली हाेती.

नवीन नांदेड नाका ते राजीव गांधी चाैक रिंग राेडही जाम...

लातूर शहरात दाखल हाेण्यासाठी नांदेड नाका ते राजीव गांधी चाैक रिंग राेडचा काहींनी वापर केला. मात्र, शहरात औसा मार्गावरून दाखल हाेणारी आणि नांदेड राेड रिंग राेडने येणाऱ्या वाहनांचा राजीव गांधी चाैकात एकच गाेंधळ उडाला. येथे जवळपास दाेन तासांच्या प्रयत्नानंतर वाहतूक काेंडी फाेडण्यात पाेलिसांना यश आले.

छत्रपती शिवाजी महाराज चाैकातही काेंडी...

छत्रपती शिवाजी महाराज चाैकातील चारही मार्गांवर वाहतूक काेंडी झाल्याने जवळपास एक किलाेमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. सकाळ आणि सायंकाळचे चित्र सारखेच हाेते. प्रत्येकजण आपले वाहन मध्येच घुसवत असल्याने वाहतूक ठप्प झाली. याचा पालक-विद्यार्थ्यांनाच माेठ्या प्रमाणावर त्रास्त सहन करावा लागाला. चाैकातील या वाहतूक काेंडीने पाेलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाली.

Web Title: neet examination and major traffic jam in latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.