नीट : लातूरमधून आणखी दोघे ताब्यात; ५० हजार ॲडव्हान्स, ५ लाखांची डील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 05:19 AM2024-06-25T05:19:19+5:302024-06-25T05:19:32+5:30
दुसरा आरोपी संजय तुकाराम जाधव (४०, रा. लातूर) याची मन:स्थिती जिवाचे बरेवाईट करण्याची दिसून आली.
लोकमत न्यूज नेटवर्क, लातूर : नीट प्रकरणात अटकेत असणारा जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक जलीलखाँ उमरखान पठाण (रा. लातूर) यास सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील आरोपीसोबत प्रवेशपत्र घेऊन ५० हजार ॲडव्हान्स आणि संपूर्ण कामाचे ५ लाखांचे डील अशा पद्धतीने व्यवहार केल्याचे संदर्भ तपासात पुढे येत असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
गुणवाढीच्या दृष्टीने दिल्लीतील आरोपी गंगाधर याच्याशी संपर्क असलेला उमरगा आयटीआयतील इरण्णा मष्णाजी कोनगलवार (मूळ रा. देगलूर, जि. नांदेड) लातुरातील दोघा शिक्षकांकडून प्रवेशपत्र मागून घेत होता. ५० हजारांत बोलणी व्हायची. पूर्ण कामाचे ५ लाख ठरायचे, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडे आली आहे. इरण्णाच्या शोधासाठी सोमवारी एक पथक देगलूर येथे आले होते. परंतु, आरोपी त्यांच्या हाती लागला नाही. देगलूरमध्ये इरण्णा याचे भाऊ आणि इतर नातेवाईक राहतात. इरण्णा धाराशिव जिल्ह्यात स्थायिक झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
‘तो’ करणार होता जिवाचे बरेवाईट...
दुसरा आरोपी संजय तुकाराम जाधव (४०, रा. लातूर) याची मन:स्थिती जिवाचे बरेवाईट करण्याची दिसून आली. त्याच स्थितीत पोलिसांनी जाधव यास ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्यालाही अटक करण्यात आली आहे.
आयटीआय शिक्षक इरण्णाची भूमिका काय?
उमरगा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नोकरीवर असलेला इरण्णा कोनगलवार लातूर येथून ये-जा करतो. सोमवार व मंगळवारची त्याने रजा टाकल्याची माहिती आहे. लातुरातील आरोपी शिक्षक हे विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे इरण्णाला पाठवीत होती. इरण्णा ती पुढे दिल्लीला गंगाधरकडे पाठवीत. या प्रकरणात तो मध्यस्थाची भूमिका वठवीत होता व त्याच्याच माध्यमातून दिल्लीशी कनेक्शन सुरू होते.
दोघेही जिल्हा परिषद शिक्षकांचे सबएजंट?
नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमध्ये दाखल गुन्ह्यामध्ये चौकशी करीत असताना आणखी दोघांची नावे समोर आली असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
हे दोघेही आरोपी दोन शिक्षकांचे सबएजंट म्हणून काम करीत असल्याचे पुढे आले आहे. यामुळे आता एकूण सहा जणांचा संबंध या प्रकरणाशी जोडला गेला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, पेपरफुटी प्रकरणात आरोपी जलीलखाँ पठाण, संजय जाधव, इरण्णा कोनगलवार व दिल्लीचा गंगाधर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील गुन्हेगारांना सोडणार नसल्याचे मुंडे म्हणाले.
पदभार दुसऱ्या शिक्षकाकडे...
- जलीलखाँ पठाण याच्या कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील कपाट केंद्र प्रमुखाने सील केले असून, कामाचा पदभार दुसऱ्या शिक्षकाकडे दिला आहे.
- २० जूनपासून पठाण शाळेवर गैरहजर असताना २० व २१ जून रोजी मस्टरवर स्वाक्षरी केली आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना तसा अहवाल पाठविला आहे.
- अटकेसंदर्भातील कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर निलंबनाचा प्रस्ताव पाठविणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.