बीड जिल्हा तपास यंत्रणांच्या रडारवर; सात विद्यार्थ्यांकडे बिहारची प्रवेशपत्रे!
By राजकुमार जोंधळे | Published: June 30, 2024 12:33 AM2024-06-30T00:33:51+5:302024-06-30T00:36:43+5:30
नीट प्रकरण : पालक-विद्यार्थी चाैकशीच्या फेऱ्यात अडकली
राजकुमार जाेंधळे / लातूर : येथील पाेलिसांनी चाैकशी केलेल्या १४ पैकी ८ विद्यार्थ्यांकडे बिहार राज्यातील प्रवेशपत्रे आढळून आली आहेत. यात लातूरमधील एक तर सात विद्यार्थी हे बीड जिल्ह्यातील असल्याचे समाेर आले आहे. पालक-विद्यार्थी चाैकशीच्या फेऱ्यात अडकले असून, आता बीड जिल्हा तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे.
लातुरातील नीट गुणवाढ प्रकरणातील आराेपी इरण्णा काेनगलवार हा अद्यापही तपास यंत्रणांच्या हाती लागला नाही. त्याच्या अटकेसाठी पथके मागावर असून, ताे हाती लागल्यानंतरच तपासाला दिशा मिळणार आहे. त्याच्या संपर्कातील एजंटांची नावे व त्यांची कारमाने समाेर येणार आहेत. लातुरात नेमलेल्या दाेघा एजंटाच्या अटकेची कुणकुण लागताच त्याने राताेरात लातूर साेडले. पथकांनी सर्वत्र शाेध घेतला आहे, मात्र ताे चकवा देत पसार आहे.
‘त्या’ पालक-विद्यार्थ्यांची हाेणार चाैकशी...
अटकेतील आराेपी मुख्याध्यापक पठाण आणि शिक्षक जाधव याच्या माेबाइलमध्ये एकूण २२ विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे आढळून आली. यात लातूर व बीड जिल्ह्यातील विद्यार्थी असल्याचे समाेर आले. आतापर्यंत १४ जणांची चाैकशी झाली असून, उर्वरित पालक-विद्यार्थ्यांची चाैकशी केली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
अन् तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू...
लातूर नीट प्रकरणात पाेलिसांनी अटक केलेला मुख्याध्यापक पठाण, शिक्षक संजय जाधव याची चाैकशी पूर्ण झाल्याचा दावा स्थानिक तपास यंत्रणांनी केला आहे. यातील गंगाधरची चाैकशी सीबीआय करणार असून, त्यांच्या मदतीला लातूर पाेलिस राहणार आहे. या गुन्ह्याचा तपास वर्ग करण्याची कागदाेपत्री प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.