दिल्ली येथील ‘गंगाधर’ची लातूर पाेलिसांकडून चाैकशी!
By राजकुमार जोंधळे | Published: June 30, 2024 12:31 AM2024-06-30T00:31:21+5:302024-06-30T00:32:07+5:30
लातूर पाेलिस करणार सीबीआयला तपासात मदत
राजकुमार जाेंधळे,लातूर : दिल्लीतील नाेएडा भागात वास्तव्याला असलेला आराेपी गंगाधर याला सीबीआयने अटक केली असून, त्याने अलगदपणे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आपल्या विश्वासू ‘एजंटा’चे जाळे विणल्याचा प्रकार समाेर आला आहे. या जाळ्याचा लातुरातील तिघे धागा ठरले आहेत. आता याच धाग्याची व्याप्ती उलगडण्यासाठी सीबीआयच्या अटकेत असलेल्या गंगाधरची संयुक्तपणे कसून चाैकशी केली जाणार आहे. यासाठी सीबीआय लातूर पाेलिसांची मदत घेणार आहे.
नीट गुणवाढीसंदर्भात लातूर पाेलिसांनी अटक केलेला जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक जलीलखाॅ पठाण, शिक्षक संजय जाधव याच्या जबाबात इरण्णा काेनगलवार याचे नाव समाेर आले. हे कनेक्शन इरण्णाच्या माध्यमातून दिल्लीतील नाेएडात एका ऑटाेमाबाइल्स शाेरूममध्ये नाेकरी करणाऱ्या गंगाधरपर्यंत असल्याचे उघड झाले. गेल्या दाेन दिवसांपूर्वी गंगाधरला सीबीआयने अटक केली असून, या प्रकरणाच्या चाैकशीसाठी सीबीआयबराेबरच लातूर पाेलिसही पुढाकार घेणार आहेत.
दाेन दिवसांत गंगाधरला लातुरात आणले जाणार..!
लातूर नीट गुणवाढीसंदर्भातील अधिकचा तपास सीबीआयकडून केला जाणार आहे. आठ दिवसांत लातूर पाेलिस, नांदेड एटीएसने प्राथमिक तपास केला असून, ताे वर्ग करण्याची प्रक्रिया सध्या सुुरू आहे. लातुरात गुन्हा दाखल झाल्याने आराेपी गंगाधरला चाैकशीसाठी दाेन दिवसांत लातुरात आणले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
गंगाधरच्या चाैकशीत कनेक्शनचा उलगडा...
सीबीआय आणि लातूर पाेलिसांच्या चाैकशीत दिल्लीमधून नीट गुणवाढीसंदर्भात सूत्रे हलविणाऱ्या गंगाधरच्या चाैकशीतून महाराष्ट्र आणि इतर राज्यातील ‘नीट’ कनेक्शनचा उलगडा हाेणार आहे. मराठवाड्यातील किती जिल्ह्यातील एजंट गंगाधरच्या सापळ्यात अडकले? हेही समाेर येणार आहे.
अटकेतील आराेपींची संख्या तीन...
लातुरात उघड झालेल्या नीट गुणवाढीसंदर्भात गुन्हा दाखल असलेल्या चार आराेपींपैकी जलीलखाॅ पठाण, संजय जाधव यास लातूर पाेलिसांनी अटक केली, तर प्रमुख आराेपी गंगाधारला सीबीआयने दिल्लीत अटक केली. आतापर्यंत अटकेतील आराेपींची संख्या तीनवर गेली असून, चाैथा आराेपी इरण्णा काेनगलवार मात्र पाेलिसांना चकमा देत आहे.