नीट : आता बीड रडारवर, सात विद्यार्थ्यांकडे बिहारची प्रवेशपत्रे; पालक-विद्यार्थी चाैकशीच्या फेऱ्यात 

By राजकुमार जोंधळे | Published: June 30, 2024 05:44 AM2024-06-30T05:44:44+5:302024-06-30T05:45:29+5:30

पालक-विद्यार्थी चाैकशीच्या फेऱ्यात अडकले; एक लातूरचा 

Neet paper scam seven students have Bihar admit cards | नीट : आता बीड रडारवर, सात विद्यार्थ्यांकडे बिहारची प्रवेशपत्रे; पालक-विद्यार्थी चाैकशीच्या फेऱ्यात 

नीट : आता बीड रडारवर, सात विद्यार्थ्यांकडे बिहारची प्रवेशपत्रे; पालक-विद्यार्थी चाैकशीच्या फेऱ्यात 

राजकुमार जाेंधळे 

लाेकमत न्यूज नेटवर्क, लातूर: येथील पाेलिसांनी ‘नीट’प्रकरणी चाैकशी केलेल्या १४ पैकी ८ विद्यार्थ्यांकडे बिहार राज्यातील प्रवेशपत्रे आढळून आली आहेत. यात लातूरमधील एक, तर सात विद्यार्थी हे बीड जिल्ह्यातील असल्याचे समाेर आले आहे. पालक-विद्यार्थी चाैकशीच्या फेऱ्यात अडकले असून, आता बीड जिल्हा तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे.

अटकेतील आराेपी मुख्याध्यापक पठाण आणि शिक्षक जाधव याच्या माेबाइलमध्ये एकूण २२ विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे आढळून आली. यात लातूर व बीड जिल्ह्यातील विद्यार्थी असल्याचे समाेर आले. आतापर्यंत १४ जणांची चाैकशी झाली असून, उर्वरित पालक-विद्यार्थ्यांची चाैकशी केली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

इरण्णाच्या जप्त मोबाईलमध्ये अनेक गुपिते काेणाची?
लातूर-दिल्लीचे कनेक्शन जाेडणाऱ्या इरण्णा काेनगलवारचा माेबाईल नांदेड एटीएसने जप्त केला असून, त्यांच्या माेबाईलमध्ये अनेक एजंटांचा डेटा सेव्ह असल्याचे समोर आले आहे. यात काेणा-काेणा एजंटांची नावे आहेत, काेण-काेण त्याच्या संपर्कात आला आहे, या तपशिलाबाबत मात्र तपास यंत्रणांनी गुप्तता पाळली आहे.  त्याच्या अटकेसाठी पथके मागावर आहेत.

गुजरातमध्ये सीबीआयची छापेमारी
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पदवी राष्ट्रीय चाचणी प्रवेश परीक्षा (नीट-यूजी) प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी गुजरातमधील सात ठिकाणी छापे टाकल्याची माहिती शनिवारी अधिकाऱ्यांनी दिली. आनंद, खेडा, अहमदाबाद आणि गोध्रा या चार जिल्ह्यांतील संशयितांच्या ठिकाणांवर सकाळी छापे टाकण्यात आले.     - सविस्तर/देश-विदेश

काँग्रेस ‘नीट’ परीक्षेच्या मुद्द्यावर संसदेतील चर्चेपासून पळ काढू इच्छिते. काँग्रेसला चर्चा नको आहे. अराजकता निर्माण करणे, गोंधळ निर्माण करणे आणि संपूर्ण संस्थात्मक यंत्रणेच्या सुरळीत कामकाजात अडथळा आणणे हा त्यांचा एकमेव उद्देश आहे. - धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री

गंगाधरची सीबीआय करणार चाैकशी
लातूर नीट प्रकरणात पाेलिसांनी अटक केलेला मुख्याध्यापक पठाण, शिक्षक संजय जाधव याची चाैकशी पूर्ण झाल्याचा दावा स्थानिक तपास यंत्रणांनी केला आहे. यातील गंगाधरची चाैकशी सीबीआय करणार असून, त्यांच्या मदतीला लातूर पाेलिस राहणार आहे. या गुन्ह्याचा तपास वर्ग करण्याची कागदाेपत्री प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सीबीआय आणि लातूर पाेलिसांच्या चाैकशीत दिल्लीमधून सूत्रे हलविणाऱ्या गंगाधरच्या चाैकशीतून महाराष्ट्र आणि इतर राज्यातील ‘नीट’ कनेक्शनचा उलगडा हाेणार आहे. मराठवाड्यातील किती जिल्ह्यातील एजंट गंगाधरच्या सापळ्यात अडकले? हेही समाेर येणार आहे.

‘नीट-पीजी’ची दोन दिवसांत नवीन तारीख 
पदव्युत्तर राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचे (नीट-पीजी) नवीन वेळापत्रक येत्या दोन दिवसांत राष्ट्रीय परीक्षा मंडळ (एनबीई) जाहीर करेल, असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी सांगितले. स्पर्धात्मक चाचण्यांतील कथित अनियमिततेच्या कारणास्तव नीट-पीजी परीक्षा मागील आठवड्यात रद्द करण्यात आलेल्या परीक्षांपैकी एक आहे. हरयाणा भाजपच्या विस्तारित राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या वेळी प्रधान यांनी पंचकुला येथे पत्रकारांना याबाबत माहिती दिली.

- संयुक्त सीएसआयआर-यूजीसी नेट २५ ते २७ जुलैदरम्यान आयोजित केली जाईल, तर यूजीसी नेट जून २०२४ परीक्षा २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान हाेईल.
- आयआयटी, एनआयटी, आरआयई आणि सरकारी महाविद्यालयांसह निवडक केंद्रीय आणि ‘आयटीईपी’ची प्रवेश परीक्षा १० जुलै रोजी घेण्यात येणार आहे. तसेच अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षा ६ जुलै रोजी घेतली जाईल.

Web Title: Neet paper scam seven students have Bihar admit cards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.