नीट : आरोपी मुख्याध्यापकाविरूद्ध तक्रारींचा पाढा; विभागीय चौकशी होणार
By राजकुमार जोंधळे | Published: June 27, 2024 05:22 AM2024-06-27T05:22:47+5:302024-06-27T05:23:03+5:30
दिव्यांग प्रमाणपत्र, उद्धट वर्तनाचा आरोप : विभागीय चौकशी होणार
लातूर: नीटमध्ये गुणवाढ करून देण्याचे आमिष दाखविल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी मुख्याध्यापक जलीलखाँ पठाण याच्याविरूद्ध जिल्हा परिषद शिक्षण विभागात तक्रारींचा पाढा वाचला जात आहे. दरम्यान, बुधवारी जिल्हा परिषदेचे सीईओ अनमोल सागर यांनी सर्व तक्रारींची विभागीय चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले.
कोठडीत असलेला जलीलखाँ पठाण याचे मुख्याध्यापक म्हणून सहकारी शिक्षकांसमवेत उद्धटपणाचे वर्तन होते, अशा तक्रारी शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या होत्या. दोन महिलांनी तशी तक्रार दिली होती. त्यानंतर विस्तार अधिकाऱ्यांनी तक्रारीची सखोल चौकशी केली. त्यात पठाण दोषी आढळल्याचा ठपका ठेवून खुलासा मागविण्यात आला होता. त्यानंतर ते प्रकरण तिथेच थांबले होते. दरम्यान, आधुनिक लहुजी सेनेने आरोपी मुख्याध्यापकाने सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबत तक्रार दिली होती. त्याचीही चौकशी पूर्ण झाली असून, मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीसाठी सुनावणीअंती कार्यालयाने प्रमाणपत्र बहाल केले. परंतु, तक्रार असल्याने प्रमाणपत्राची पडताळणी करण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी निर्देशित केले होते.
जलीलखाँ पठाण याची प्रथम नेमणूक रायगड जिल्हा परिषदेत ११ ऑगस्ट २००९ रोजीची आहे. आंतरजिल्हा बदलीनुसार २ मे २०१३ रोजी लातूर जिल्हा परिषदेत अहमदपूर तालुक्यातील शिरसाटवाडी येथे नेमणूक झाली. त्यानंतर २ मे २०१७ रोजी लातूर तालुक्यातील कातपूर येथे मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती झाली. कातपूर येथील सेवा सुरू असतानाच आधुनिक लहुजी सेनेने दिव्यांग प्रमाणपत्राबाबत १८ डिसेंबर २०२३ रोजी तक्रार दिली आहे. संघटनेचे उपाध्यक्ष प्रदीपभाऊ थोरात यांनी प्रमाणपत्राबाबत आक्षेप घेतले होते. सुनावणी घेऊन निकाल राखीव ठेवत दिव्यांग प्रमाणपत्र दिले. तसेच प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठविण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर वस्तुस्थिती समोर येणार असून, त्यानुसार शिक्षण विभाग पुढील कार्यवाही करेल.
सर्व तक्रारींची चौकशी...
जलीलखाँ पठाण याचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस आहे की खरे आहे, याची पडताळणी ज्या कार्यालयाने प्रमाणपत्र दिले आहे, त्या कार्यालयाने करावे असे सुनावणीत ठरले आहे. त्यानुसार प्रमाणपत्र संबंधित कार्यालयाकडे पाठविले आहे. दरम्यान, नीटमध्येही गुन्हा दाखल झाल्याने याआधीच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ज्या वेगवेगळ्या तक्रारी आहेत, त्या सर्वांचीच एकत्रित विभागीय चौकशी केली जाणार आहे. - अनमोल सागर, सीईओ, लातूर