Coronavirus : उदगीरच्या कोरोनाबाधित मृत महिलेच्या संपर्कातील १८ जणांचे अहवाल निगेटिव्ह; ८ प्रलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 07:21 AM2020-04-27T07:21:14+5:302020-04-27T07:21:54+5:30
दरम्यान कोरोना बाधा पसरू नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत आहे. उदगीरमध्ये संचारबंदीचा अंमल कठोरपणे केला जात आहे.
लातूर : उदगीर येथील कोरोना बाधित मयत महिलेच्या संपर्कातील १८ जणांचे अहवाल रविवारी रात्री सव्वा बारा वाजता निगेटिव्ह आले आहेत. मात्र अद्यापि ८ अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान कोरोना बाधा पसरू नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत आहे. उदगीरमध्ये संचारबंदीचा अंमल कठोरपणे केला जात आहे.
लातूर जिल्ह्यात यापूर्वी परराज्यातील ८ यात्रेकरू कोरोनामुक्त झाले. मात्र उदगीरमध्ये मधुमेह व अन्य आजार असणाऱ्या कोरोना बाधित ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली. त्यामुळे सदर महिलेच्या संपर्कातील २६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.
जिल्ह्यात आतापर्यंत २६९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ९ बाधितांपैकी ८ कोरोनामुक्त झाले. एक बाधित वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. रविवारच्या तपासणीत लातूर शहरातील सर्व ७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तसेच चाकूरचाही एक अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर यांनी दिली. उदगीरचे उर्वरित ८ अहवाल सोमवारी दुपार पर्यंत मिळतील असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी सांगितले.
उदगीरकडे लक्ष...
वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी उदगीरच्या स्थितीचा आढावा घेतला. महिलेच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन केले आहे. महिलेचे वास्तव्य असलेल्या परिसरातील अडीच हजार कुटुंबांची तपासणी सुरू केली आहे. पर्यावरण व पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे हे उदगीरमधील लोकप्रतिनिधी, डॉक्टरांशी सतत संपर्कात आहेत. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी लागण पसरू नये म्हणून लोकांना घराबाहेर पडू नका असे आवाहन केले आहे.