नोटिसा बजावूनही दुर्लक्ष; अखेर अतिक्रमणांवर जेसीबी
By हरी मोकाशे | Published: April 26, 2023 06:11 PM2023-04-26T18:11:38+5:302023-04-26T18:11:52+5:30
ग्रामपंचायतीने पोलिस बंदोबस्तात दोन जेसीबी, चार ट्रॅक्टरच्या सहाय्याने ही अतिक्रमणे हटविली आहेत.
वलांडी : देवणी तालुक्यातील वलांडी येथील मुख्य रस्त्यावर काही जणांनी अतिक्रमणे केली आहेत. ही अतिक्रमणे स्वत:हून काढून घ्यावीत, म्हणून ग्रामपंचायतीने तीनदा नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने बुधवारी ही अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.
देवणी तालुक्यातील वलांडी हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. विविध कामानिमित्ताने आणि आठवडी बाजारसाठी परिसरातील जवळपास ४० गावांतील नागरिकांचा येथे संपर्क असतो. सतत वर्दळ असते. गावातील बसस्थानक ते मुख्य बाजारपेठ या रस्त्यावर काही जणांनी अतिक्रमणे केल्याने या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असते. ही कोंडी दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यावर ग्रामपंचायतीमध्ये सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर हा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्यात आला होता.
अखेर बुधवारी ग्रामपंचायतीने पोलिस बंदोबस्तात दोन जेसीबी, चार ट्रॅक्टरच्या सहाय्याने ही अतिक्रमणे हटविली आहेत. यावेळी तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी सोपान अकेले, सरपंच राणीताई भंडारे, उपसरपंच महेमुद सौदागर, माजी सरपंच राम भंडारे, महेश बंग, ग्रामविकास अधिकारी एच. एम. केंद्रे, पोलिस निरीक्षक गणेश सोंडारे, मंडळ अधिकारी बालाजी केंद्रे, तलाठी अबरार शेख, बीट अंमलदार शौकत सय्यद, उदय शेटकर आदी उपस्थित होते.