ना निकाल जाहीर होणार, ना कार्यवाही; तरीही शिक्षक 'प्रेरणा' परीक्षेस अनुत्सुक!

By हरी मोकाशे | Published: July 28, 2023 05:58 PM2023-07-28T17:58:00+5:302023-07-28T17:58:26+5:30

जिल्हा परिषदतर्फे घेण्यात येणाऱ्या ऐच्छिक परीक्षेस केवळ ४४४ शिक्षकांचा होकार

Neither the result will be announced, nor the proceedings; Still teachers not ready for Prerana exam! | ना निकाल जाहीर होणार, ना कार्यवाही; तरीही शिक्षक 'प्रेरणा' परीक्षेस अनुत्सुक!

ना निकाल जाहीर होणार, ना कार्यवाही; तरीही शिक्षक 'प्रेरणा' परीक्षेस अनुत्सुक!

googlenewsNext

लातूर : शिक्षकांचे विषयज्ञान वृध्दिंगत व्हावे तसेच विद्यार्थ्यांना चौफेर अद्ययावत ज्ञान देण्यासाठी क्षमता अधिक दृढ व्हावी म्हणून तत्कालिन विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेनुसार शिक्षक प्रेरणा परीक्षा रविवारी व सोमवारी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऐच्छिक असून निकाल जाहीर होणार नाही अथवा कुठली कार्यवाहीही होणार नाही. तरीही शिक्षक अनुत्सुक असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील केवळ ४४४ शिक्षकांनी परीक्षेसाठी होकार दिला आहे.

जिल्हा परिषद शाळा तसेच अनुदानित खाजगी शाळांची गुणवत्ता अधिक वाढावी. शिक्षकांचे विषयज्ञान अधिक वृध्दिंगत होण्याबरोबरच विद्यार्थ्यांचा चौफेर विकास व्हावा म्हणून मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि अनुदानित खाजगी शाळांतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी ही प्रेरणा परीक्षा घेण्याचे नियाेजन करण्यात आले आहे. ही परीक्षा ऐच्छिक असून अधिकाधिक शिक्षकांनी सहभागी व्हावे म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात आले.

ही परीक्षा शहरातील देशिकेंद्र विद्यालयाच्या केंद्रावर रविवार आणि सोमवारी होणार आहे. सकाळी १० ते दुपारी २ वा. पर्यंतच्या वेळेत एकूण सहा विषयांची परीक्षा होणार आहे.

जिल्ह्यात १५ हजार शिक्षक...
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १२७७ शाळा आहेत. या शाळांवर ५ हजार ५९२ शिक्षक कार्यरत आहेत. तसेच अनुदानित खाजगी शाळेवर ९ हजार २३९ शिक्षक आहेत. एकूण १४ हजार ८३१ शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी ४४४ शिक्षकांनी या ऐच्छिक परीक्षेस होणार दर्शविला आहे.

दररोज तीन विषयांचे पेपर...
रविवारी सकाळी १० ते ११ वा. पर्यंत भौतिकशास्त्र, ११.३० ते १२.३० वा. पर्यंत रसायनशास्त्र, दुपारी १ ते २ वा. पर्यंत जीवशास्त्र विषयाचा पेपर होणार आहे. सोमवारी सकाळी १०.११ वा. पर्यंत गणित, ११.३० ते १२.३० वा. पर्यंत इंग्रजी आणि दुपारी १ ते २ वा. पर्यंत इतिहास आणि भूगोल विषयाची परीक्षा होणार आहे.

प्रत्येक पेपर ५० गुणांचा...
प्रत्येक पेपर हा ५० गुणांचा असून चार उत्तरे चुकली की एक गुण वजा होणार आहे. एकूण ३०० गुणांची परीक्षा असणार आहे. परीक्षेत किमान ५० टक्के गुण अपेक्षित आहेत. विशेष म्हणजे, ऐनवेळीही इच्छुक शिक्षकास ही परीक्षा देता येणार आहे.

प्रश्नपत्रिका सीईओंच्या ताब्यात...
शिक्षक प्रेरणा परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेचा संच आला असून तो जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. परीक्षे दिवशीच ते पेपर बाहेर काढण्यात येणार आहेत. ही परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या ५० शिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. उर्वरित कुठलाही निकाल जाहीर करण्यात येणार नाही अथवा कुठलीही कार्यवाही करण्यात येणार नाही.

Web Title: Neither the result will be announced, nor the proceedings; Still teachers not ready for Prerana exam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.