विद्युत पुरवठ्याअभावी आरोग्य केंद्राची नवीन इमारत धूळखात पडून !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:13 AM2021-07-23T04:13:32+5:302021-07-23T04:13:32+5:30
किनगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र साधारणतः पन्नास वर्षांपूर्वी पाच एकर परिसरामध्ये बांधण्यात आले होते. इमारतीला जागोजागी तडे गेले ...
किनगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र साधारणतः पन्नास वर्षांपूर्वी पाच एकर परिसरामध्ये बांधण्यात आले होते. इमारतीला जागोजागी तडे गेले आहेत व कर्मचारी वसाहतीची दुरवस्था झाली असून, छताचा गिलावा गळून पडून कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तीन कोटी रुपये खर्च करून नवीन इमारत बांधण्यात आली आहे; परंतु केवळ विद्युत पुरवठ्याअभावी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धूळखात पडून आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.
किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दररोज २०० ते २५० बाह्यरुग्ण तपासणी केली जाते. या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लातूर जिल्ह्यासह परभणी, बीड जिल्ह्यातील लोक उपचारासाठी येतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आली असून, ती सद्य:स्थितीत जीर्ण झाली आहे. तसेच कर्मचाऱ्यांसाठी सात निवासस्थाने व अधिकाऱ्यांसाठी दोन निवासस्थाने बांधण्यात आली आहेत; पण तेही जीर्ण झाले असून जागोजागी इमारतीला तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी छताचा गिलावा पडून जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून वसाहतीमध्ये राहावे लागत आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत पायाभूत सुविधा विकास कक्ष जिल्हा परिषदेच्या वतीने किनगाव येथे २ कोटी ९० लाख रुपये खर्च करून नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधण्यात आली आहे. या नवीन आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी कक्ष २, ऑपरेशन कक्ष एक, लॅब कक्ष, लसीकरण कक्ष, अपघात विभाग, परिचारिका कक्ष, औषध निर्माता कक्ष, आस्थापना, पुरुष वाॅर्ड व महिला वाॅर्ड, असे बारा कक्ष बांधण्यात आले आहेत. नवीन इमारतीत वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली नाहीत. या नवीन इमारतीच्या विद्युतीकरणासाठी २४ लाख ९५ हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे; परंतु संबंधित गुत्तेदार याने सिंगल फेजचे कनेक्शन नवीन इमारतीला दिल्यामुळे सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नवीन इमारतीचा प्रवेश रखडला आहे.
थ्री फेज विद्युत पुरवठा करणे गरजेचे...
नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये थ्री फेज विद्युत पुरवठा करणे गरजेचे आहे. तसा शासन नियम आहे; पण संबंधित ठेकेदाराने सिंगल फेज विद्युत पुरवठ्याचे विद्युत मीटर त्याठिकाणी बसवल्याने विद्युत पुरवठ्यामध्ये सातत्याने व्यत्यय येत असून, विद्युत पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. तत्काळ थ्री फेज विद्युत पुरवठा सुरू केल्यास रुग्णांची गैरसोय होणार नाही व नवीन इमारत वापरात येईल.
- डॉ. प्रमोद सांगवीकर,
वैद्यकीय अधिकारी