नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच दणका; ५५ मद्यपी चालकांवर गुन्हे दाखल
By राजकुमार जोंधळे | Updated: January 1, 2025 20:12 IST2025-01-01T20:12:13+5:302025-01-01T20:12:27+5:30
नाकाबंदी : लातूर जिल्ह्यात ४६१ चालकांविराेधात कारवाई...

नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच दणका; ५५ मद्यपी चालकांवर गुन्हे दाखल
राजकुमार जाेंधळे / लातूर : नववर्षाच्या पूर्वसंध्येला पाेलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये ५५ मद्यपी चालक आढळून आले आहेत. त्यांच्याविराेधात त्या-त्या पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भरधाव, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या तब्बल ४६१ वाहनचालकांवर लातूर पाेलिसांनी कारवाई केली असून, तीन लाख ४१ हजारांचा दंड वसूल केला आहे.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकांविराेधात लातूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत केलेल्या कारवाईमध्ये ५५ मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्याचबराेबर अतिवेगामध्ये वाहन चालविणे, भररस्त्यावर वाहन थांबविणे, रहदारीला अडथळा करणे, हायगय आणि बेदरकारपणे वाहन चालवून इतरांच्या जीविताला धाेका निर्माण हाेईल, स्वत:चा जीव धोक्यात घालणाऱ्या एकूण ४६१ चालकांवर पाेलिसांनी थेट गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून ३ लाख ४१ हजार २०० रुपयांचा दंडही वसूल केला आहे.
सार्वजनिक ठिकाणी
मद्यपींकडून शांतता भंग...
नववर्षाच्या स्वागतासाठी काहीजण सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करून शांतता भंग केल्याचे आढळून आले. मद्यपींकडून होणारे अपघात, त्यात मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिवाय, मद्य प्रशासन करून वाहन चालविणाऱ्यांकडून नियमांचा सर्रासपणे भंग केला जात आहे. परिणामी, मद्यपींकडून वाहन चालविणाऱ्यांविरोधात लातूर पोलिसांनी कारवाई केली आहे.
लातूर जिल्ह्यात २३ पाेलिस
ठाण्यांच्या हद्दीमध्ये तपासणी...
जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करून दुचाकी, चारचाकींसह इतर वाहनांची तपासणी करण्यात आली. वाहनचालकांनी मद्यप्राशन केल्याचे आढळल्याने त्यांच्याविराेधात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मद्य प्रशान करून वाहन चालविणे, स्वतःसह इतरांच्या जीविताला धाेका पाेहोचविणे, वाहतुकीचे नियम माेडणाऱ्यांवर पाेलिसांनी कारवाई केली आहे.
१,१२७ पाेलिस अधिकारी
अन् कर्मचारी बंदाेबस्तावर...
लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध २३ पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत मंगळवारी रात्री तगडा बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता. जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, अप्पर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे यांच्यासह १०२ पाेलिस अधिकारी, ४२५ पाेलिस कर्मचारी, ६०० हाेमगार्डस् बंदाेबस्तावर हाेते. मंगळवारी दुपारी ४ वाजल्यापासून बुधवारी पहाटे ६ वाजेपर्यंत हा बंदाेबस्त हाेता.