‘नाफेड’कडे तूर खरेदी शून्य; बाजारभावानुसार दर देऊनही शेतकरी धजावेनात
By हरी मोकाशे | Published: January 4, 2024 05:29 PM2024-01-04T17:29:59+5:302024-01-04T17:30:49+5:30
गेल्या तीन वर्षांपासून खुल्या बाजारपेठेत तुरीचे दर वाढले आहेत. त्या तुलनेत नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर कमी दर आहेत.
लातूर : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीपेक्षा खुल्या बाजारात तुरीला अधिक भाव असल्याने राज्य शासनाने यंदा ‘नाफेड’मार्फत बाजारभावानुसार तूर खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. तीन दिवस उलटले तरी एक रुपयाची खरेदी झाली नाही. त्यामुळे नाफेडच्या खरेदी केंद्रांवर तूर विक्रीसाठी शेतकरी धजावत नसल्याचे पाहावयास मिळत आहे.
गेल्या तीन वर्षांपासून खुल्या बाजारपेठेत तुरीचे दर वाढले आहेत. त्या तुलनेत नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर कमी दर आहेत. परिणामी, शेतकऱ्यांनी खुल्या बाजारास पसंती दिली आहे. त्यामुळे आधारभूत किंमत योजनेंतर्गतच्या हमीभाव केंद्रावर तूर खरेदी झाली नाही. हे पाहून राज्य शासनाने यंदा प्रथमच बाजारभावानुसार तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन केले.
जिल्ह्यात खरिपात सर्वाधिक साडेचार लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. त्यापाठोपाठ तुरीचा ६४ हजार ४६३ हेक्टरवर पेरा झाला होता. सध्या काही ठिकाणी तूर काढणी सुरू असून, शेतकरी बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहेत.
२३ शेतकऱ्यांची विक्रीसाठी नोंदणी
तूर विक्री नोंदणीसाठी ‘नाफेड’ने जिल्ह्यात सहा केंद्रांना मंजुरी दिली आहे. २२ डिसेंबरपासून विक्रीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. आतापर्यंत औसा तालुक्यातील केंद्रावर १०, देवणी ३, लातूर ४, रेणापूर १ आणि सताळा (ता. अहमदपूर) येथील केंद्रावर ५ अशा एकूण २३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. दरम्यान, अद्यापही नोंदणी सुरूच असल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी सांगितले.
तीन वर्षांपासून रुपयाची खरेदी नाही...
गेल्या तीन वर्षांपासून नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर एक रुपयाचीही तूर खरेदी झाली नाही. कारण, हमीभावापेक्षा खुल्या बाजारात तुरीला अधिक दर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
वर्षाला तीनशे रुपयांची वाढ...
वर्ष - हमीभाव
२०२०-२१ - ६०००
२०२१-२२ - ६३००
२०२२-२३ - ६६००
२०२३- २४ - ७०००
मुंबईहून कळणार दररोजचा भाव...
यंदा प्रथमच बाजारभावानुसार तूर खरेदी होणार आहे. त्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. आतापर्यंत २३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, तीन दिवसांत एकाही शेतकऱ्याने तूर विक्री केली नाही. दरम्यान, तुरीचा दररोजचा भाव हा नाफेडच्या मुंबई येथील कार्यालयातून कळविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा.
-विलास सोमारे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.
गरजेवेळी पैसे मिळण्यास अडचण...
बाजारभावानुसार तूर खरेदी करण्याचा नाफेडचा उपक्रम चांगला आहे. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना चार पैसे अधिक मिळतील. मात्र, हमीभाव केंद्रावर शेतमालाची विक्री केल्यानंतर काही दिवसांनी पैसे मिळतात. गरजेवेळी पैसे मिळत नाहीत. आर्थिक अडचणींतील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे अडचण होते.
-विलास देशमाने, शेतकरी.
८ हजार ७०० रुपये सर्वसाधारण भाव...
लातूर बाजार समितीत बुधवारी तुरीची १२ हजार १३१ क्विंटल आवक झाली होती. कमाल भाव ९ हजार २०० रुपये, किमान ७ हजार ९९९ रुपये, तर सर्वसाधारण ८ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.