निलंगेकर साखर कारखान्याची सव्वादाेन काेटींची फसवणूक!५१ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 08:52 PM2023-07-08T20:52:20+5:302023-07-08T20:52:38+5:30
लातूर : जिल्ह्यातील शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना, लीज ओंकार साखर कारखना प्रा.लि. युनिट-२ अंबुलगा (बु.), ता. निलंगा ...
लातूर : जिल्ह्यातील शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना, लीज ओंकार साखर कारखना प्रा.लि. युनिट-२ अंबुलगा (बु.), ता. निलंगा या कारखान्याला ऊसताेड मजूर आणि वाहनांचा पुरवठा करताे, असे म्हणून अनामत रक्कम उचलून, मजूर आणि वाहनांचा पुरवठा केला नाही. यातून कारखान्याला तब्बल २ काेटी २२ लाख ३२ हजार ५७७ रुपयांना गंडविले. याबाबत निलंगा पाेलिस ठाण्यात ५१ जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, अंबुलगा येथील शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना लीज ओंकार सहकारी साखर कारखाना प्रा.लि. युनिट-२ चा हंगाम २०२२-२०२३ साठी ऊसताेड मजूर आणि वाहन उपलब्ध करून देण्याबाबतचा करार झाला हाेता. दरम्यान, करार करणाऱ्यांना आरटीजीएस आणि धनादेशाद्वारे २ काेटी ३२ लाख ५७७ रुपये देण्यात आले. मात्र, संबंधित ठेकेदारांनी मजूर, शिफारसकर्त्यांनी वाहन आणि मजुरांचा पुरवठा न करता साखर कारखान्याची तब्बल सव्वादाेन काेटींना फसवणूक केली. याबाबत निलंगा पाेलिस ठाण्यात साखर कारखान्याचे व्यवस्थापक सागर दिनकर मार्तंडे (३१, रा. राजेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली), यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरनं. २१५/ २०२३ कलम ४२०, ४०६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूरसह परभणी अन् बीड जिल्ह्यांतील ठेकेदारांचा समावेश... -
निलंगेकर साखर कारखान्याला मजूर आणि वाहनांचा पुरवठा करण्याच्या करारामध्ये लातूरसह परभणी आणि बीड जिल्ह्यातील ठेकदारांचा समावेश आहे. दरम्यान, यांना कारखान्याने अनामत म्हणून आरटीजीएस आणि धनादेशाद्वारे एकूण २ काेटी २२ लाख ३२ हजार ५७७ रुपयेइतकी रक्कम दिली आहे. मात्र, त्यांनी मजुरांसह वाहनांचा पुरवठा न करता कारखान्याचीच फसवणूक केली आहे. तपास पाेलिस निरीक्षक बी.आर. शेजाळ करत आहेत.