नऊ हजार विद्यार्थिनींनी घेतला शिक्षणासाठी एसटीचा मोफत पास, यंदा २ टक्क्यांनी वाढली संख्या
By हणमंत गायकवाड | Published: July 26, 2023 03:37 PM2023-07-26T15:37:10+5:302023-07-26T15:37:31+5:30
सवलतीच्या दरामध्ये सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी पास दिला जातो, तर मुलींसाठी मोफत पास आहे.
लातूर : ग्रामीण भागातील मुलींना शहरात शिक्षणाची सोय व्हावी म्हणून अहिल्यादेवी होळकर योजनेंतर्गत मोफत पास देण्याची योजना राज्य परिवहन महामंडळाकडून राबविण्यात येत आहे. यावर्षी ९१३८ विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. ५ वी ते १२वीपर्यंतच्या मुलींना शाळेत, महाविद्यालयांत जाण्यासाठी एसटीने मोफत पासची सोय केली आहे.
यंदा गतवर्षीपेक्षा पास घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या दोन टक्क्यांनी वाढली आहे. अहिल्यादेवी होळकर योजनेमध्ये आतापर्यंत ९,१३८ मुलींनी पास घेतला आहे, तर सर्वसाधारण ७,६२० विद्यार्थ्यांनी विद्यार्थी पास घेतला आहे. सवलतीच्या दरामध्ये सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी पास दिला जातो, तर मुलींसाठी मोफत पास आहे. त्यासाठी आगार प्रमुखांकडून कॅम्पही घेतले जात आहेत.
पास योजनेतूनही एसटीला उत्पन्न...
अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत ५वी ते १२वीच्या मुलींना मोफत पास दिला जातो. या योजनेत जुलै २०२३ पर्यंत लातूर आगारातून १,७८९ मुलींना पास देण्यात आला. यात महामंडळाला ६९ लाख ५६ हजार ६४० रुपये उत्पन्न मिळाले असल्याची माहिती बसस्थानक प्रमुख हनुमंत चपटे यांनी दिली.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा पासची संख्या वाढली...
लातूर जिल्ह्यातील पाचही आगारातून गतवर्षीच्या तुलनेत मोफत पासच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
मागील दोन वर्षे कोरोनामुळे पासेसची संख्या घटली होती. मात्र यावर्षी मोफत पासची संख्या वाढलेली आहे. याचाच अर्थ शाळेतील पट सुधारलेला आहे.
मुलींना एसटीचा पास
लातूर १५८४
उदगीर १४१८
अहमदपूर १९२०
निलंगा २०३१
औसा २१८५
एकूण ९,१३८
मुलांना एसटीचा पास
लातूर २०९१
उदगीर १२३७
अहमदपूर ११११
निलंगा १८५८
औसा १३२३
एकूण ७,६२०