निटूर -डांगेवाडी परिसर गुड आवाजाने हादरला; भीतीने नागरिक रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 02:48 PM2023-02-04T14:48:51+5:302023-02-04T14:49:07+5:30
निलंगा तालुक्यातील निटूर-डांगेवाडी परिसरात दुपारी १.१४ वाजता गुड आवाज
- जावेद मुजावर
केळगाव (जि. लातुर) : निलंगा तालुक्यातील निटूर-डांगेवाडी परिसर शनिवारी दुपारी १.१४ वाजता गुड आवाजाने हादरला असून, गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, घटनास्थळी तलाठी, ग्रामसेवक यांनी धाव घेत प्रशासनाला माहिती कळविली आहे.
निलंगा तालुक्यातील निटूर-डांगेवाडी परिसरात शनिवारी दुपारी १.१४ वाजता जमिनीतून गुड आवाज आला. त्यामुळे भयभीत झालेले नागरिक रस्त्यावर आले. दरम्यान हा आवाज परिसरातील डांगेवाडी-निटूर, कलांडी, बुजरुकवाडी, माचरटवाडी या परिसरातही जाणवला असून, काही ग्रामस्थांच्या घरातील रॅकमध्ये ठेवलेले डबे खाली पडले असल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, याबाबत निलंगा तहसीलदार अनुप पाटील म्हणाले, सदरील परिसरातील नागरिकांचे फोन आल्यानंतर त्या ठिकाणी मंडळ अधिकारी व तलाठी यांना पाठविण्यात आले असून, माहिती संकलित करण्यास सांगितले आहे.
वेधशाळेकडून माहिती घेण्याचे काम सुरू...
निलंगा तालुक्यातील निटूर-डांगेवाडी परिसरात शनिवारी दुपारी १.१४ वाजता गुड आवाज झाल्याची माहिती मिळाली असून, लातूर येथील भुकंप मापक वेधशाळेकडे हा गुड आवाज होता की भूकंपाचा सौम्य धक्का? याबाबत माहिती घेत आहोत. याबाबत लवकरच माहिती मिळेल. - साकेब उस्मानी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, लातूर
निलंगा तालुक्यात यापूर्वीही भूकंपाचे धक्के...
निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरातही यापूर्वी मागील वर्षी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. दरम्यान, या ठिकाणी दिल्लीच्या पथकाने पाहणी करून, भूकंप मापक यंत्र बसविले होते. आता पुन्हा तीन महिन्यानंतर निटूर-डांगेवाडी परिसरात गुड जमिनीतून आवाज आला आहे.