नळेगावच्या सरपंच, उपसरपंचावर अविश्वास ठराव मंजूर
By हरी मोकाशे | Published: March 27, 2023 07:13 PM2023-03-27T19:13:56+5:302023-03-27T19:16:11+5:30
नळेगाव येथील ग्रामपंचायतीची निवडणूक दोन वर्षांपूर्वी झाली होती.
नळेगाव : चाकूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नळेगाव येथील सरपंच व उपसरपंचावरील अविश्वास ठराव सोमवारी बहुमताने मंजूर झाला आहे. त्यामुळे या दोन्ही पदाधिकाऱ्यांना पायउतार व्हावे लागणार आहे.
नळेगाव येथील ग्रामपंचायतीची निवडणूक दोन वर्षांपूर्वी झाली होती. सरपंचपदी ताजुद्दीन फत्तुसाब घोरवाडे तर उपसरपंच रवी शंकरराव शिरुरे यांची निवड करण्यात आली होती. दरम्यान, सरपंच घोरवाडे हे ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. मनमानी कारभार करीत आहेत. सदस्यांना अरेरावीची भाषा वापरतात. गावातील दिवाबत्ती, पाणीपुरवठा अशा मूलभूत सुविधांकडे ते दुर्लक्ष करतात. त्यामुळे ग्रामस्थांना मुलभूत सुविधा मिळत नाही. ग्रामसभेच्या अभिलेखात खाडाखोड केली आहे. ग्रामपंचायतीच्या जागेवर विनापरवाना दुकानाचे बांधकाम केले आहे, अशी तक्रार ग्रामपंचायतीचे सदस्य सूर्यकांत चव्हाण, श्याम मुंजाने, उमाकांत सावंत, शेषेराव जोगदंड, सतीश पांडे, अशपाक मुजावर, पद्मीन खांडेकर, कावेरी गाडेकर, अलिमुन चाँद मचकुरी, अनुसया सावळकर, जनाबाई सुरवसे, संजिदाबी शमीम सय्यद, जनाबाई शिरुरे या तेरा सदस्यांनी २१ मार्च रोजी प्रशासनाकडे केली होती.
या तक्रारीमुळे सोमवारी तहसीलदार शिवानंद बिडवे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. यात सरपंच आणि उपसरपंचाविरुध्द अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे तहसीलदार बिडवे यांनी सांगितले. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.