मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही: जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर 

By संदीप शिंदे | Published: July 28, 2023 06:32 PM2023-07-28T18:32:37+5:302023-07-28T18:33:04+5:30

जळकोट तालुक्यातील नुकसानीची पाहणी

No farmer will be deprived of help: Collector Varsha Thakur | मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही: जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर 

मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही: जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर 

googlenewsNext

जळकोट : तालुक्यात मागील आठवड्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेती, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी शुक्रवारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शासकीय मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही. प्रशासन शेतकऱ्यांसोबत असून, पंचनामे पूर्ण झाले आहेत. रस्ते, पुल व नुकसानीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले असून, लवकरच मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जळकोट तालुक्यातील रावणकोळा, मरसांगवी, अतनूर, शिवाजीनगर तांडा, गुत्ती, घोणसी या भागातील शेतीपिके व खरडून गेलेल्या जमिनीची जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. प्रशासन तुमच्या सोबत असून, काळजी करू नका असे सांगून ज्यांच्या घराची पडझड झाली त्यांना घरकुल मंजूर करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. तसेच मरसांगवी शेजारी असलेल्या पुलाची उंची वाढवावी, दोन नद्यांचे पाणी गावात शिरल्याने संसाराेपयोगी साहित्य वाहून जात असल्याचे सुलोचना देवकर यांनी सांगितले. रावणकोळा येथील एक व्यक्ती वाहून गेल्याची माहिती सरपंच सत्यवान पाटील व सत्यवान दळवे यांनी दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार सुरेखा स्वामी, गटविकास अधिकारी मेडेवार, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी नगराध्यक्ष प्रभावती कांबळे, उपनगराध्यक्ष मन्मथप्पा किडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, सत्यवान पाटील दळवे, मेहताब बेग, रामराव राठोड, सत्यवान पांडे, रवी घोडके, चंद्रशेखर पाटील, शादुल्ला शेख, उमाकांत इमडे, आयुब शेख, बाबर पटेल, नबी शेख, मुखराम शेख, रेश्मा पटेल, सुरज भिसे, अतिक शेख, मंडळाधिकारी कांबळे, धनराज दळवे, इस्माईल मुंजेवार, विश्वनाथ वाघमारे, सुमनबाई वाघमारे उपस्थित होते.

प्रशासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी...
नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून मदत केली जाणार आहे. याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, कोणीही खचून जाऊ नये, असेही जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

Web Title: No farmer will be deprived of help: Collector Varsha Thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.