किती ही लूट, भाजी मंडईत कांदा १० रुपये, तर घराजवळ २० रुपये किलाे ।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:19 AM2021-08-01T04:19:29+5:302021-08-01T04:19:29+5:30
लातूर : प्रत्येकाच्या किचनमध्ये असलेला कांदा महात्मा फुले भाजी मंडईत ७ ते १० रुपये प्रतिकिलाे दराने मिळत आहे. मात्र, ...
लातूर : प्रत्येकाच्या किचनमध्ये असलेला कांदा महात्मा फुले भाजी मंडईत ७ ते १० रुपये प्रतिकिलाे दराने मिळत आहे. मात्र, घरासमाेर आलेल्या भाजीपाला विक्रेत्यांकडून हाच कांदा २० ते ३० रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे व्यापारी, विक्रेत्यांकडून ग्राहकांची जवळपास दुप्पट लूट हाेत असल्याचे समाेर आले आहे.
कांद्याचे भाव कधी सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतात तर कधी आवाक्याबाहेर जातात. तीन महिन्यांपूर्वी हाच कांदा १०० रुपयांच्या घरात गेला हाेता. मात्र, कांद्याची आवक वाढली आणि पुन्हा भाव घसरले. महात्मा फुले भाजी मंडईत कांदा १० रुपये किलाे दराने मिळत आहे. मात्र, ताेच कांदा भाजीपाला विक्रेते २० ते ३० रुपये दराने विकत आहेत. आठवडा बाजारात कांद्याचे दर २० रुपयांच्या घरात आहेत. यातून व्यापाऱ्यांची नफेखाेरी वाढत असली तरी सामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. यावर काेणाचे नियंत्रण आहे, असा प्रश्न त्रस्त नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
महात्मा फुले भाजी मंडईत कांदा १० तर रयतू बाजारात १५ रुपये किलाे
लातुरातील महात्मा फुले भाजी मंडई आणि इतर भागात कांद्याचे दर वेगवेगळे आहेत. रयतू बाजारात दरदिवशी खेड्या-पाड्यातून माेठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची आवक हाेते. येथे हाच कांदा १५ ते २० रुपये किलो दराने विक्री केला जात आहे. गाेलाईत हाच कांदा २० ते २५ रुपयांच्या घरात आहे.
अर्धा-पाव किलाेसाठी हाेलसेल बाजारात जाणे नाही परवडत ।
कांदा हा दरराेजच्या स्वयंपाकात वापरला जाताे. भाव कमी असो अथवा अधिक ताे खरेदी करावाच लागताे. दारासमाेर येणाऱ्या नियमित विक्रेत्यांकडून खरेदी करावा लागताे. - अनिता लातूरकर
सध्या काेराेनाचा काळ आहे. त्यामुळे दारावर आलेल्या विक्रेत्यांकडूनच भाजीपाला घेतला जात आहे. भाजी मंडईत भाव कमी असला तरी तेथे जाणे परवडत नाही. दरराेज पाव-अर्धा किलाे भाजीपाला लागताे. त्यासाठी भावाचा विचार करत नाही.
- सुनीता शिरुरकर
मेहनत शेतकऱ्यांची... तिप्पट नफा मात्र व्यापाऱ्यांची हाती...
लातूर जिल्ह्यात भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची माेठी संख्या आहे. हा भाजीपाला नागपूर, हैदराबाद, पुणे, लातूरच्या मंडईत जाताे. मात्र, मंडईत हाेणाऱ्या बीटद्वारे भाव ठरवले जातात.
व्यापारी शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा खरेदी करतात आणि ताे किरकाेळ विक्रेत्यांकडे साेपवतात. या प्रक्रियेत व्यापारी दुप्पट ते तिप्पट नफा कमवतात.
शेतकऱ्यांकडून व्यापारी आणि त्यांच्याकडून किरकाेळ विक्रेते आणि ग्राहक अशी ही साखळी आहे. किरकाेळ व्यापारी दारावर भाजीपाला विक्री करतात, मात्र तीही दुप्पट भावात.
एवढा फरक कसा...
भाजीपाल्याचे दर हे हंगामानुसार ठरतात. त्याचवेळी बाजारातील टंचाई लक्षात घेत भाव वाढवले जातात. आवक वाढली की भाव घसरतात. कांद्याचेही असेच आहे. आवक घटली की मग कांदा सामान्यांना रडवताे.
- उत्तम गायकवाड
हातगाड्यांवर भाजीपाला हा दाराेदार फिरुन विकावा लागताे. त्यातच भाजी मंडईतील घाऊक भावात भाजीपाला विकता येत नाही. दारावर पाव, अर्धा आणि किलाेचा भाव ठरताे. मग या भावात फरक पडताे. घाऊकमध्ये हाच भाव निम्म्यावर येताे.
- संजय उमरगेकर