ना कुणाची मदत, ना जगण्याचे साधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:18 AM2021-05-16T04:18:41+5:302021-05-16T04:18:41+5:30
शहराच्या व बनशेळकी गावच्या सीमेवर असलेल्या गोपाळ नगर भागात हे तृतीयपंथी राहतात. शहरातील बाजारपेठेतील नागरिकांसमोर सकाळपासून ते रात्रीपर्यंत हात ...
शहराच्या व बनशेळकी गावच्या सीमेवर असलेल्या गोपाळ नगर भागात हे तृतीयपंथी राहतात. शहरातील बाजारपेठेतील नागरिकांसमोर सकाळपासून ते रात्रीपर्यंत हात पसरून जे देतील ते घेऊन त्यांना आशीर्वाद द्यायचा हा त्यांचा नित्यक्रम. प्रसंगी काही तृतीयपंथी रेल्वेने प्रवास करीत भीक मागतात. पुरुषांच्या डब्यात गेल्यानंतर भीक मिळत नाही, उलट अश्लील भाषेत बोलले जाते. हे सर्व सहन करीत टिचभर पोटासाठी हे प्रवास करीत असतात. महिलांच्या डब्यात गेल्यास महिला त्यांना हुसकावून लावतात. परंतु, हे त्यांच्या अंगवळणी पडले आहे. प्रवासात कुण्या महिलांची छेड काढल्यास रेल्वे पोलीस अथवा प्रवासी त्यांची दखल घेतात. परंतु, त्यांना सर्वांसमोर अश्लील भाषेत बोलले जाते. मात्र, त्यांची कोणीही दखल घेत नाही, अशी खंत व्यक्त करीत आम्हाला जगण्याचा हक्क आहे की नाही असा प्रश्न पडतो, असेही अंजली पटेल म्हणाली.
कोरोनामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. समाजातील अशा उपेक्षितांचे हाल तर न विचारलेले बरे. त्यांना राहायला चांगल्या वस्तीत कोणीही भाड्याने घर देत नाही. जिथे मिळेल तिथे राहावे म्हटले तर दुप्पट- तिप्पट घरभाडे द्यावे लागते. शासकीय दप्तरी नोंद नसल्याने साधे ओळखपत्रही नाही. मागील वर्षीच्या टाळेबंदीच्या वेळी तत्कालीन तहसीलदारांनी व इतर सामाजिक संघटनांनी धान्याच्या रूपात मदत केली होती. रेशनकार्ड देण्याचे त्यांनी कबूल केले होते. परंतु, नंतर त्यांची बदली झाली आणि परिस्थिती जैसे थे राहिली.
यावेळी कोणीही फारशी मदत केली नाही. त्यामुळे प्रसंगी उपाशी राहण्याची वेळ आली. कुठलेही शासकीय कागदपत्र, ओळखपत्र नसल्याने रेशनचे धान्य मिळू शकत नाही. मग आम्ही काय खायचे? सरकारने आम्हाला मदत करावी. किमान अन्नधान्य तरी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी अंजली पटेल यांनी केली.
तृतीयपंथियांकडे उपजीविकेचे कोणतेच साधन उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात मानसिक तणावातून जावे लागत आहे. समाजापासून अगोदरच वंचित असताना कोरोनामुळे आणखीनच दूर लोटले आहे, असेही त्या म्हणाल्या.
आश्वासनांशिवाय पदरी काहीही नाही...
तृतीयपंथीयांसाठी काही वर्षांपासून काम करणारे भरत गायकवाड हे आपल्या आधार सेवा प्रतिष्ठानमार्फत रेशन कार्ड, निवासासाठी घरकुल मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु मदतीसाठी सामाजिक व राजकीय लोकप्रतिनिधीकडे गेल्यास आश्वासनाशिवाय पदरी काहीच पडले नाही. त्यामुळे हळूहळू धीर खचत आहे.
मृत्यूनंतरही हाल...
उदगीर येथे राहणाऱ्या अंजली पटेल म्हणाल्या, जगण्यासाठीचा आमचा संघर्ष अंगवळणी पडला आहे. परंतु, मृत्यूनंतरही आमचे हाल आहेत. कारण या भागात जर कोणी मृत्यू पावला, तर त्याला अंत्यविधीसाठी हैदराबाद, तुळजापूर अथवा अंबाजोगाईला घेऊन जावे लागते. जिल्ह्यामध्ये तृतीयपंथीयांच्या अंत्यविधीसाठी जागाच उपलब्ध नाही.