पुनर्नियुक्ती आदेश मिळेनात, वेतनही रखडले; लातूर जिल्हा परिषदेतील कंत्राटींचा जीव टांगणीला!
By हरी मोकाशे | Published: July 10, 2023 05:28 PM2023-07-10T17:28:15+5:302023-07-10T17:28:47+5:30
हे कर्मचारी कंत्राटी पध्दतीने जवळपास २७ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना दर सहा महिन्यांनी एक दिवसाचा खंड देऊन जिल्हा परिषदेकडून पुनर्नियुक्ती आदेश दिले जातात.
लातूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील समग्र शिक्षा अभियानअंतर्गत जवळपास १९६ कंत्राटी कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांचा नियुक्तीचा कालावधी मे अखेरीस संपुष्टात आला आहे. त्यामुळे त्यांना जूनच्या पहिल्या आठवड्यात पुनर्नियुक्ती आदेश मिळणे अपेक्षित होते. मात्र, सव्वामहिना उलटला तरी अद्यापही हे आदेश मिळाले नाहीत. या कर्मचाऱ्यांना धास्ती लागली आहे. विशेष म्हणजे, वेतनही थकित राहिले आहे.
शासनाच्या वतीने समग्र शिक्षा अभियान राबविण्यात येते. या अभियानाअंतर्गत कर्मचाऱ्यांची कंत्राटी पध्दतीने नियुक्ती करण्यात येते. हे कर्मचारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत आहेत. प्राथमिक शिक्षण विभाग आणि शाळा यांच्यामधील दुवा म्हणून हे कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांना शाळापूर्व तयारी बैठक, विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करुन घेऊन ते ऑनलाईनरित्या सादर करण्यासाठी पाठपुरावा करणे, शिक्षण परिषद, शाळा भेटी, पाठ्यपुस्तक वितरण, गणवेश वाटप निधी वितरित करणे, हंगामी वस्तीगृहासाठी सर्वे यासह अन्य काही शैक्षणिक सर्वे करावे लागतात.
दरम्यान, हे कर्मचारी कंत्राटी पध्दतीने जवळपास २७ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना दर सहा महिन्यांनी एक दिवसाचा खंड देऊन जिल्हा परिषदेकडून पुनर्नियुक्ती आदेश दिले जातात. मात्र, यंदा प्रथमच सव्वा महिना उलटला तरी अद्यापही पुनर्नियुक्ती आदेश देण्यात आले नाहीत.
१९६ कंत्राटी कर्मचारी धास्तावले...
समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत कंत्राटी पध्दतीने अभियंता, संगणक प्रोगामर, डाटा एन्ट्री ऑपरेटर, एमआयएस कॉडिनेटर, साधन व्यक्ती, विशेष शिक्षक असे एकूण १९६ जण आहेत. विशेष म्हणजे, हे कर्मचारी सन १९९५ पासून सुरु झालेल्या डीपीईपीपासून कार्यरत आहेत. सन २००१ मध्ये त्याचे सर्व शिक्षा अभियान असे रुपांतर झाले. त्यानंतर सन २०२१ मध्ये सग्रम शिक्षा असा बदल झाला आहे.
सहा महिन्यांनंतर एक दिवसाचा खंड...
या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दर सहा महिने झाले की, एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन जिल्हा परिषदेकडून पुनर्नियुक्ती देण्यात येते. दरम्यान, या कर्मचाऱ्यांचा नियुक्तीचा कालावधी ३० मे रोजी संपुष्टात आला आहे. मात्र, त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात पुनर्नियुक्ती मिळणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही ती मिळाली नाही.
नेहमीप्रमाणे कामावर रुजू...
सहा महिने झाले की पुनर्नियुक्ती देण्यात येते, हे जवळपास २५ वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे एक दिवसाचा खंड घेऊन पुन्हा आम्ही कामावर कार्यरत होतो. त्यानुसार आताही रुजू झालो. मात्र, महिना उलटला तरी पुनर्नियुक्ती आदेश मिळाले नाहीत. त्यामुळे एक महिन्याचे वेतन थकित राहिले आहे, असे या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सांगितले.
मी चार दिवसांपूर्वी रुजू...
बदली झाल्याने मी चार दिवसांपूर्वी रुजू झालो आहे. त्यामुळे या विषयासंदर्भात मला माहिती नाही. तसेच हा विषय माझ्याकडे येत नाही.
- प्रमोद पवार, उपशिक्षणाधिकारी.