निलंगा तालुक्यात पुन्हा भूगर्भातून आवाज; जमीन हादरल्याने नागरिकांत भीती
By हरी मोकाशे | Published: September 8, 2022 05:25 PM2022-09-08T17:25:41+5:302022-09-08T17:26:03+5:30
. भूकंपाचे धक्के असण्याच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडले होते.
निलंगा (जि. लातूर) : तालुक्यातील हासोरी बु. गावात गुरुवारी दुपारी २.१२ वा.च्या सुमारास पुन्हा भूगर्भातून अचानक मोठा आवाज झाला. त्यामुळे नागरिक काही क्षणातच घराबाहेर येत सुरक्षित स्थळी जाण्यासाठी सर्वांची धावपळ उडाली होती.
तालुक्यातील हासोरी बु. येथे दोन दिवसांपूर्वी म्हणजे मंगळवारी रात्री १०.१२ वा. च्या सुमारास भूगर्भातून अचानक आवाज येऊन जमीन हादरली होती. भूकंपाचे धक्के असण्याच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडले होते. दरम्यान, हा भूगर्भातून आवाज झाला असून भूकंप नसल्याची माहिती तालुका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती.
गुरुवारी दुपारी नेहमीप्रमाणे नागरिक आपली कामे करीत होती. दरम्यान, २.१२ वा. च्या सुमारास पुन्हा भूगर्भातून आवाज येत जमीन हादरली. तसेच घरातील भांडीही हादरली. त्यामुळे नागरिकांनी खुल्या सुरक्षित जागेत धाव घेतल्याचे गावातील नागरिकांनी सांगितले. दरम्यान, प्रभारी तहसीलदार सुरेश घोळवे म्हणाले, हा गुढ आवाज आहे. भूकंपाचे धक्के असते तर परिसरातील गावांतील जमीन हादरली असती. त्यामुळे नागरिकांनी घाबरु नये, असे आवाहन केले आहे.
भूकंप नाही...
हासोरी बु. गावात जमीन हादरल्याची माहिती मिळाली असून तो भूकंप नाही. भूकंपाची आपोआप भूकंप मापन केंद्रावर नोंद होते, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी सांगितले.