लातूर शहरातील पूर्व भागात भूगर्भातून आवाज; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By संदीप शिंदे | Published: February 15, 2023 02:55 PM2023-02-15T14:55:49+5:302023-02-15T14:56:48+5:30
यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या आवाजाची भूकंप मापक केंद्रात कोणतीही नोंद झालेली नाही.
लातूर : शहरातील पूर्व भागात बुधवारी सकाळी १०.३० ते १०.४५ वाजताच्या सुमारास भूगर्भातून आवाज आला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या आवाजाची भूकंप मापक केंद्रात कोणतीही नोंद झालेली नाही.
लातूर शहरातील पूर्व भागातील विवेकानंद चौक, साठफुटी रोड परिसरात बुधवारी सकाळी १०.३० ते १०.४५ वाजेच्या दरम्यान भूगर्भातून आवाज झाला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ प्रशासन कळविले. दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने लातूर, औराद शहाजनी, आशिव येथील भूकंप मापक केंद्रावरून माहिती घेतली असता त्यावर कोणतीही नोंद झालेली नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी सांगितले. दरम्यान, भूगर्भातील हवेच्या पोकळीमुळे असा आवाज येत असल्याचा अंदाज आपत्ती व्यवस्थापन विभागाने वर्तविला आहे.
भूगर्भातून आवाजाची मालिका सुरूच...
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात भूगर्भातून दोन ते तीन वेळेस आवाज झाला होता. तेव्हा दिल्लीच्या पथकाने पाहणी करून लातूर, आशिव, औराद शहाजानी येथे भूकंप मापक यंत्र बसविले आहेत. दरम्यान, याच महिन्यात ४ तारखेला निलंगा तालुक्यातील निटूर-डांगेवाडी परिसरातही भूगर्भातून आवाज आला होता. आता लातूर शहरातील पूर्व भागातही बुधवारी सकाळी भूगर्भातून आवाज आला आहे.