लातूरात ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन; जिल्हा प्रशासनास माहिती देणे थांबविले
By हरी मोकाशे | Published: February 5, 2024 05:08 PM2024-02-05T17:08:07+5:302024-02-05T17:08:55+5:30
प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास १५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार
लातूर : आश्वासित प्रगती योजना १०,२०,३० मंजुरी आदेश काढावेत, कंत्राटी ग्रामसेवकांना नियमित करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा शाखेच्या वतीने असहकार आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे गावपातळीवरील नोंदींची माहिती जिल्हा परिषदेस देणे थांबले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. आंतर जिल्हा बदलीने बदलून आलेल्या ग्रामसेवकांना आगाऊ वेतनवाढ देण्यात यावी, सन २०१९- २० ते २०२२- २३ या कालावधीतील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करुन वितरित करण्यात यावेत, सन २०१६- १७ चा आदर्श ग्रामसेवक पुरस्काराची वेतनवाढ इतर जिल्हा परिषदांप्रमाणे देण्यात यावी, प्रलंबित वैद्यकीय बिले देण्यात यावेत, प्रशासकीय बदली झालेल्या ग्रामसेवकांना प्रवासभत्ता देण्यात यावा, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी संवर्गावर असलेली अतिरिक्त कामे कमी करावीत, अशा मागण्यांसाठी हे असहकार आंदोलन सुरु करण्यात आले आहे. हे आंदोलन १ फेब्रुवारीपासून सुरु झाले आहे, असे संघटनेेचे जिल्हा सरचिटणीस श्याम मुस्के यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेसमोर धरणे...
प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास १५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी यांनी सांगितले.