घरकुल योजनेचा लाभ मिळेना; लातूरच्या मोहननगर झोपडपट्टीतील नागरिकांचा मनपासमोर ठिय्या
By हणमंत गायकवाड | Updated: February 20, 2024 19:13 IST2024-02-20T19:13:26+5:302024-02-20T19:13:47+5:30
कबाले देऊन रमाई घरकुल योजनेचा लाभ देण्याची मागणी

घरकुल योजनेचा लाभ मिळेना; लातूरच्या मोहननगर झोपडपट्टीतील नागरिकांचा मनपासमोर ठिय्या
लातूर : मोहननगर झोपडपट्टीतील नागरिकांनी जागेचे कबाले देण्याच्या मागणीसाठी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर मंगळवारी ठिय्या मांडला. या आंदोलनात मोहननगरातील २०० ते २५० महिला, पुरुष सहभागी झाले होते. १९७९ पासून वास्तव्यास असलेल्या या नागरिकांना अद्याप जागेचे कबाले दिले नाहीत. त्यामुळे त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही.
महानगरपालिकेच्या ज्या जागेत महादेवनगर झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीत गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या या नागरिकांना जागेचा कबाला मिळालेला नाही. शासन निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांच्या कबाल्याच्या अनुषंगाने प्रस्ताव नगरचना पुणे विभागाकडे पाठविण्यात आला होता. परंतु त्यावर कारवाई झालेली नाही. जागेचा कबाला नसल्यामुळे घरकुल योजनेचाही लाभ मिळत नाही, असे या नागरिकांचे म्हणणे आहे. जागेचे कबाला देऊन रमाई घरकुल योजनेत घरे बांधून देण्यात यावेत, अशी मागणी या भागातील नागरिकांनी राजाभाऊ माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली. यावेळी महादेव नगरातील सुरेश गायकवाड, बालाजी शिंदे, शिवराम कांबळे, चिमणाबाई कांबळे, अर्चना कांबळे, हेमा बनसोडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आठ दिवसात निर्णय घेऊ; आयुक्तांचे आश्वासन
मोहननगरातील नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार न्याय दिला जाईल. संबंधित यंत्रणाकडे पाठपुरावा करून कबाले तसेच घरकुल बांधून देण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला आयुक्तांनी दिले असल्याचे राजाभाऊ माने यांनी सांगितले. येत्या आठ दिवसात कबड्डी देण्याचा निर्णय न झाल्यास मनपात नागरिकांचे आंदोलन होईल, असे माने म्हणाले.