घरबसल्या नाही, लातूर मनपात जाऊनच प्रमाणपत्र; ५२ ऑनलाइन सेवांचा प्रारंभालाच बोजवारा
By हणमंत गायकवाड | Published: May 27, 2024 07:39 PM2024-05-27T19:39:38+5:302024-05-27T19:41:06+5:30
संकेतस्थळावर नवीन पोर्टल अद्ययावत करण्याची घोषणा हवेतच
लातूर : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ नुसार लातूर शहर महानगरपालिकेमार्फत नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने एकूण ५२ सेवांचा लाभ घेता येईल. त्यासाठी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर नवीन पोर्टल अद्ययावत करण्यात आले आहे, असे जाहीर करून मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी या सेवेचा प्रारंभ करण्यात आला होता. मात्र वास्तवात कोणतीही सेवा ऑनलाइन पद्धतीने सुरू झालेली नाही. जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी यासारख्या सर्व सेवा ऑफलाइनच आहेत.
महानगरपालिकेने जन्म प्रमाणपत्र देणे, मृत्यू प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, झोन दाखला देणे, भाग नकाशा देणे, बांधकाम परवाना, जोती प्रमाणपत्र देणे, भोगवटा प्रमाणपत्र देणे, अग्निशमन नाहरकत दाखला देणे, अग्निशमन अंतिम नाहरकत दाखला देणे, मालमत्ता कर उतारा देणे, थकबाकी नसल्याचा दाखला देणे, नव्याने कर आकारणी करणे, पुन्हा कर आकारणी करणे, कराची मागणी पत्र तयार करणे, कर माफी मिळणे, रहिवासी नसलेल्या मालमत्ताना करातून सूट मिळणे, स्वयमूल्यांकन आक्षेप नोंदविणे, वापरामध्ये बदल करणे,पाणी देयके तयार करणे, प्लंबर परवाना, प्लंबर परवाना नूतनीकरण करणे, नादुरुस्त मीटर तक्रार करणे, अधिकृत नळजुळणी तक्रार करणे, पाण्याची दबाव क्षमता तक्रार, पाण्याची गुणवत्ता तक्रार, नवीन परवाना मिळणे, परवानाचे नूतनीकरण, परवान्याचे हस्तांतरण,परवाना दुय्यम प्रत, व्यवसायाचे नाव बदलणे, व्यवसाय बदलणे, परवाना रद्द करणे यासारख्या ५२ प्रकारच्या सेवा ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या मिळतील असे महानगरपालिकेने जाहीर केले होते. विशेष म्हणजे २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी या सेवांचा प्रारंभ आयुक्त बाबासाहेब मनोहर यांच्या हस्ते करण्यात आला. परंतु वास्तवात कोणतेही प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने मिळत नाही. ५२ सेवांचा बोजवारा उडालेला आहे. नुसतेच उद्घाटन करण्यात आले. सेवा मात्र मिळत नाही अशी स्थिती आहे.
महानगरपालिका, बँक आणि कंत्राटदार कंपनी बैठक...
महानगरपालिकेकडून देण्यात येणाऱ्या ५२ सेवांचा प्रारंभालाच बोजवारा उडालेला आहे. शुल्क भरण्यासाठी निवडलेली बँक तसेच ही सेवा करून देणारी कंपनी आणि महानगरपालिकेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक चार जूननंतर होणार आहे त्यानंतरच ही सेवा सुरू होईल. तूर्तास ५२ सेवा ऑफलाइन पद्धतीनेच नागरिकांना घ्यावा लागत आहेत.
घरबसल्या नाही, मनपात जाऊनच प्रमाणपत्र...
महापालिकेचे सर्व जुने व नवीन अभिलेखांचे संपूर्ण स्कॅनिंग व डिजिटलायझेशन करण्याचे काम चालू असून अंदाजपत्रकामध्ये त्यासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आलेली आहे. सर्व विभागासाठी प्रिंटर दुरुस्तीसाठी अंदाजपत्रकात ९१ लाखांची तरतूद करण्यात आलेली होती. ५२ सेवांचाही उल्लेख अंदाजपत्रकात आहे. मात्र सेवा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना घरबसल्याऐवजी महापालिकेत जाऊन जन्म, मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र घ्यावे लागत आहे.