तळेगावच्या शेतकऱ्यांना आलेल्या नोटीसा वक्फ बोर्डाकडून गेलेल्या नाहीत- अध्यक्ष समीर काजी

By आशपाक पठाण | Updated: December 8, 2024 18:46 IST2024-12-08T18:46:35+5:302024-12-08T18:46:59+5:30

याचिकाकर्त्याने वक्फ न्यायाधीकरणात तक्रार केल्याने निघाल्या समन्स

Notices received by Talegaon farmers not from Waqf Board: President Sameer Kazi | तळेगावच्या शेतकऱ्यांना आलेल्या नोटीसा वक्फ बोर्डाकडून गेलेल्या नाहीत- अध्यक्ष समीर काजी

तळेगावच्या शेतकऱ्यांना आलेल्या नोटीसा वक्फ बोर्डाकडून गेलेल्या नाहीत- अध्यक्ष समीर काजी

लातूर / अहमदपूर : राज्य शासनाच्या वक्फ न्यायाधिकरणात याचिकाकर्ते पटेल सय्यद इरफान यांच्या अर्जावरून अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील जवळपास १०३ शेतकरी व महाराष्ट्र शासन यांना ३० मे रोजी नोटिसा बजावण्यात आल्या. एकाचवेळी शंभरावर शेतकऱ्यांना नोटिसा आल्याने अनेकांनी वकिलांमार्फत आपले म्हणणे सादर केले. यावर आता २० डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, तळेगावच्या शेतकऱ्यांना पाठविलेल्या नोटीशीसी वक्फ बोर्डाचा संबंध नसल्याचे रविवारी बाेर्डाने स्पष्ट केले आहे.

तळेगावच्या जमिनीवर महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण औरंगाबादच्या न्यायालयाने याचिका क्र . १७/ २०२४ अन्वये हा दावा केला आहे. त्याचप्रमाणे संबंधित शेतकऱ्यांना ३० मे २०२४ रोजी बजावण्यात आलेल्या नोटिसीमध्ये, वक्फ न्यायाधिकरणात वैयक्तिकरीत्या किंवा प्लीडरद्वारे अपीलाशी संबंधित सर्व भौतिक प्रश्नांची उत्तरे देण्याबाबत समन्स बजावण्यात आले आहे. न्यायाधिकरणास उत्तर देण्यास सक्षम असलेली एखादी व्यक्ती असेल, दाव्याचे उत्तर आणि हजेरीसाठी निश्चित केलेले मुद्दे निकाली काढण्यासाठी, अपीलच्या अंतिम निकालासाठी नियुक्त केले गेले आहे, त्या दिवशी तुम्ही सर्व साक्षीदार आणि कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे, असे नमूद केले. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी वक्फ न्यायाधिकरणाकडे धाव घेतली आहे. अनेकांनी वकिलांमार्फत आपले म्हणणे सादर केले आहे.

तीन पिढ्यांपासून जमीन कसतो...

माझी पाच एकर जमीन आहे. आमच्या तीन पिढ्यांपासून आम्ही ही जमीन कसतो. आमच्याकडे खासरा पानी नक्कल, सात-बारा आदी पुरावे आहेत. २० डिसेंबर रोजी औरंगाबाद वक्फ न्यायाधिकरणाकडे हे पुरावे वकिलांमार्फत सादर करणार आहोत. एकाचवेळी गावातील १०३ शेतकऱ्यांना नोटिसा आल्यामुळे शेतकरी घाबरले आहेत. - तुकाराम कानवटे, शेतकरी, तळेगाव.

शासनाकडून शपथपत्र दाखल केले जाईल...
तळेगाव येथील १०३ शेतकऱ्यांच्या जवळपास ३०० एकर जमिन प्रकरणी शेतकऱ्यांना वक्फ न्यायाधीकरणाच्या नोटीसा आल्या आहेत. याची संपूर्ण माहिती घेऊन शासनातर्फे शपथपत्र दाखल करण्यात येणार आहे. -उज्जवला पांगरकर, तहसीलदार, अहमदपूर.

राज्य वक्फ बोर्डाचा संबंध नाही...
तळेगाव येथील शेतकऱ्यांना पाठविलेल्या नोटिसा एका व्यक्तीने वक्फ ट्रिबुनल कोर्टात दावा दाखल केल्यानंतर कोर्टाने काढल्या आहेत. त्या नोटीसा वक्फ बोर्डाकडून गेलेल्या नाहीत. आम्ही लातूर जिल्ह्यातील कुठल्याही गावच्या जमीनीवर दावा केलेला नाही. - समीर काजी, अध्यक्ष, वक्फ बोर्ड, महाराष्ट्र राज्य.

Web Title: Notices received by Talegaon farmers not from Waqf Board: President Sameer Kazi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.