माता मृत्यू रोखण्यासाठी आता 'सेव्ह मॉम' मोहीम, जिल्हा परिषदेचा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम

By हरी मोकाशे | Published: February 17, 2024 04:26 PM2024-02-17T16:26:05+5:302024-02-17T16:26:36+5:30

मोहिमेअंतर्गत अतिजोखमीच्या गरोदर महिलांच्या कुटुंबियांच्या मोबाईलवर आपली आरोग्य सेवा उद्या असून ती घ्यावी, असा संदेश दिला जाणार आहे.

Now 'Save Mom' campaign to prevent maternal mortality, Zilla Parishad initiative based on modern technology | माता मृत्यू रोखण्यासाठी आता 'सेव्ह मॉम' मोहीम, जिल्हा परिषदेचा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम

माता मृत्यू रोखण्यासाठी आता 'सेव्ह मॉम' मोहीम, जिल्हा परिषदेचा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम

लातूर : रक्तक्षय, मधुमेह, उच्च रक्तदाब, कमी उंचीची माता, गंभीर आजार अशा कारणांमुळे गरोदर मातांच्या जीवास प्रसूतीदरम्यान मोठा धोका असतो. अनेकदा या समस्यांमुळे मातांचा मृत्यू होतो. तो रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत प्रयोगिक तत्त्वावर सेव्ह मॉम हा नवा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. मोहिमेअंतर्गत अतिजोखमीच्या गरोदर महिलांच्या कुटुंबियांच्या मोबाईलवर आपली आरोग्य सेवा उद्या असून ती घ्यावी, असा संदेश दिला जाणार आहे.

माता व बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यास चांगले यश आले असले तरी ग्रामीण भागात माता मृत्यूचे प्रमाण काही प्रमाणात आहे. गरोदर महिलांपैकी १५ ते २० टक्के महिला ह्या अतिजोखमीच्या असतात. त्यांना नियमितपणे उपचार न मिळाल्यास गरोदर ते प्रसूतीपश्चात दरम्यानच्या कालावधीत काही महिलांच्या जीवास धोका होण्याची भीती अधिक असते. त्यामुळे अतिजोखमीच्या गरोदर महिलांना वेळेवर आरोग्य सेवा मिळावी म्हणून तामिळनाडूतील सेव्ह मॉम या संस्थेची मदत घेत हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

सात प्रकारच्या ऑनलाईन नोंदी
तामिळनाडूतील सेव्ह मॉम संस्था आणि राज्य शासनाच्या सहभागातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत गरोदर महिलांच्या सात प्रकारच्या नोंदी ऑनलाईनरित्या होणार आहेत. त्यात जोडप्याचे वयाेगट, गरोदर महिलेची वैद्यकीय माहिती, नोंदणी, वजन, उंची, रक्त, प्रसूतीची अपेक्षित तारीख, प्रसूती कोठे केली जाणार अशा प्रकारच्या आहेत.

आरोग्य कर्मचाऱ्यांची चारदा गृहभेट
गरोदरपणाच्या कालावधीत आरोग्य कर्मचारी चारदा सदरील महिलेच्या घरी भेट देऊन ऑनलाईन नोंदी भरण्याबरोबर समुपदेशन करणार आहेत. या नोंदी जिल्हास्तरावर दिसणार आहेत. त्याआधारे सदरील मातेस पुढील तपासणी, उपचाराची आठवण करुन देणारा संदेश मोबाईलवर येणार आहे. तसेच अतिजोखमीच्या मातांना उपचारासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.

चार आरोग्य केंद्रात सुरु
हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा, हलगरा तर उदगीर तालुक्यातील हेर आणि देवर्जन या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.

आरोग्य यंत्रणाही सतर्क
आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गरोदर मातांची ऑनलाईन नोंदणी केली जाते. त्यातील एखाद्या मातेची आरोग्य तपासणी, साेनोग्राफी अशा तपासण्या राहिल्या असल्यास त्या करुन घेण्यासाठी ऑनलाईनरित्या मोबाईलवर संदेश येणार आहे. त्याचबरोबर सदरील मातेच्या सेवेबद्दल आरोग्य यंत्रणेलाही सतर्क करण्यात येणार आहे.

अधिकाधिक गरोदर महिलांना आरोग्य सेवा
माता मृत्यू रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नवा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे कुठलीही गरोदर माता उपचारापासून दुरावली असेल तर त्याची नोंद होऊन त्या महिलेच्या कुटुंबियांच्या मोबाईलवर आरोग्यसेवेबद्दल संदेश जाणार आहे. त्यामुळे ती लवकरात लवकर उपचार घेईल.
- अनमोल सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

Web Title: Now 'Save Mom' campaign to prevent maternal mortality, Zilla Parishad initiative based on modern technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर