आरटीईत आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी !
By संदीप शिंदे | Published: May 26, 2023 04:37 PM2023-05-26T16:37:30+5:302023-05-26T16:37:42+5:30
मुदतवाढ देऊनही १०५० विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित
लातूर : आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. जिल्ह्यात १६६९ जागा असून, राज्यस्तरीय सोडतीमध्ये १६४८ जणांची सोडत लॉटरी निघाली. निवड झालेल्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी २२ मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, त्याकडे पालकांनी पाठ फिरविली असून, आतापर्यंत केवळ १०५० प्रवेश झाले आहेत. त्यामुळे आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे.
आरटीईसाठी जिल्ह्यात २०० शाळांनी शिक्षण विभागाकडे नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये १ हजार ६६९ जागा असून, पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय सोडतीमध्ये १६४८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. मात्र, यातील १ हजार ५० विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले आहेत. प्रवेश निश्चितीसाठी २२ मे ही तिसरी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, मनासारखी शाळा न मिळणे, घरापासून शाळा दुर असणे आदी कारणांमुळे काही पालकांनी प्रवेशाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे उर्वरित ६१९ जागांवर आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात येणार आहे. याबाबत पुणे येथूनच पालकांना मार्गदर्शक सुचना देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
तीन वेळेस मुदतवाढ देऊनही दुर्लक्ष...
पुणे येथे ५ एप्रिल रोजी राज्यस्तरीय सोडत निघाली. त्यानंतर १२ एप्रिलपासून पालकांना निवडीचे संदेश पाठविण्यात आले. २५ एप्रिलपर्यंत कागदपत्रे पडताळणी करुन, ३० एप्रिलपर्यंत प्रवेश निश्चित करायचे होते. मात्र, पालकांच्या मागणीनुसार ८ मे पर्यंत मुदत दिली. त्यानंतर तिसऱ्यांदा २२ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तीनवेळेस मुदतवाढ देऊनही पालकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी, ६१९ जागांवरील प्रवेश अद्यापही रखडलेलेच आहेत.
प्रतीक्षा यादीतील पालकही संभ्रमात...
शिक्षण विभागाकडून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांबाबत लवकर निर्णय घेण्याची गरज आहे. नवीन शैक्षणिक वर्षाला काही दिवसांत सुरुवात होणार आहे. आरटीईमध्ये प्रतीक्षा यादीत नाव असल्याने काही पालकांनी इतर शाळेत मुलांचे प्रवेश निश्चित केले आहेत. आता त्यांना आरटीईअंतर्गत प्रवेशाचा संदेश आला तर जुना प्रवेश रद्द करावा लागणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबतच्या मार्गदर्शक सुचना लवकर जाहीर करण्याची मागणी पालकांतून होत आहे.