आता विव्हळत रात्र काढावी लागणार नाही; कुठल्याही वेळी मिळणार वाडीतांड्यावर तत्काळ औषधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 16:59 IST2022-07-23T16:56:27+5:302022-07-23T16:59:33+5:30
या आरोग्य केंद्रांतून २४ तास सेवा दिली जात असली तरी दिवसभराच्या ठराविक वेळेनंतर सर्दी, ताप, डोकेदुखी, पोटदुखी, जखम झालेल्यांना साधी गोळीही मिळत नाही, हे वास्तव आहे.

आता विव्हळत रात्र काढावी लागणार नाही; कुठल्याही वेळी मिळणार वाडीतांड्यावर तत्काळ औषधी
- हरी मोकाशे
लातूर : गावोगावी, वाडी- तांड्यांवरील लहान मुला- मुलींसह प्रत्येक नागरिकाला घरपोच औषध- गोळ्या उपलब्ध करणारा राज्यातील पथदर्शी प्रकल्प लातूर जिल्हा परिषदेने प्रस्तावित केला असून येणाऱ्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी प्रत्यक्ष योजना कार्यान्वित होणार आहे. सर्दी, ताप, डोकेदुखी, पोटदुखी अशा आजारांसाठीची औषधे घेऊन आशा स्वयंसेवक गरजूच्या घरी तत्काळ पोहोचणार आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयापासून ते प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातून नाममात्र दरात रुग्णांना आरोग्यसेवा पुरविली जाते. या आरोग्य केंद्रांतून २४ तास सेवा दिली जात असली तरी दिवसभराच्या ठराविक वेळेनंतर सर्दी, ताप, डोकेदुखी, पोटदुखी, जखम झालेल्यांना साधी गोळीही मिळत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे अशा त्रासाने त्रस्त असलेल्यांना मेडिकल दुकानदाराचा आधार घ्यावा लागतो.
बहुतांश वेळेस रात्री- अपरात्री असा त्रास जाणवू लागल्यास विव्हळत रात्र काढावी लागते. त्यामुळे सकाळ कधी होईल आणि सरकारी दवाखाना अथवा मेडिकल दुकान कधी उघडेल, याकडे डोळे लागलेले असतात. सर्दी, ताप, डोकेदुखी, पोटदुखी असा त्रास जाणवणाऱ्या खेड्यापाड्याबरोबरच वाडी- तांड्यावरील रुग्णांना तत्काळ गोळ्या औषधी मिळावी म्हणून जिल्हा परिषदेने १५ वित्त आयोगातून १० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात ७८६ ग्रामपंचायती असून त्याअंतर्गत ११९४ गावे, वाडी- तांडे आहेत. त्यासाठी एकूण ४६ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २५२ उपकेंद्र आहेत. याअंतर्गत १ हजार ७०३ आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकांमार्फत वेदनाशामक गोळ्यांबरोबर जखमेवर मलमपट्टी, किशोरवयीन मुलींच्या रक्तवाढीसाठी गोळ्या दिल्या जाणार आहेत.
आशांना लवकरच मेडिकल किट...
कोविड काळात आशा कार्यकर्ती यांचे उत्कृष्ट कार्य राहिले आहे. त्या घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करतात. त्यांना आता मेडिकल किट दिले जाणार असून त्यात गोळ्या औषधी असणार आहेत. त्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. या किटमुळे तत्काळ आरोग्य सेवा मिळणार आहे.
- अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
दुखणे अंगावर काढले जाणार नाही...
आशा कार्यकर्ती यांना अद्ययावत मेडिकल किट दिले जाणार आहेत. त्यातून रुग्णांना वेळेवर सेवा मिळेल. त्यातून वेळ व पैशांची बचत होईल. तसेच ते दुखणे अंगावर काढणार नाहीत. याशिवाय, आशांचे सबलीकरण होईल.
- डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.