स्वतंत्र ट्रॅक नसल्याने अडथळ्यांची शर्यत; सायकलपटूंच्या चाकांना गती मिळेना!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 05:16 PM2023-08-11T17:16:01+5:302023-08-11T17:16:47+5:30

शहरात पाच वर्षांच्या बालकांपासून ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या बहुतांश जणांना सायकलिंगचा छंद लागला आहे.

Obstacle race as there is no separate track for cycling; Cyclists' wheels do not get speed! | स्वतंत्र ट्रॅक नसल्याने अडथळ्यांची शर्यत; सायकलपटूंच्या चाकांना गती मिळेना!

स्वतंत्र ट्रॅक नसल्याने अडथळ्यांची शर्यत; सायकलपटूंच्या चाकांना गती मिळेना!

googlenewsNext

- महेश पाळणे
लातूर :
आरोग्यासाठी सर्वजण दक्ष राहतात. कोणत्या ना कोणत्या व्यायामाचा छंद जोपासत नागरिक पहाटेपासूनच कसरती करतात. कोरोनापासून तर आरोग्याकडे लक्ष वाढले आहे. यात सायकलिंग अनेकजण प्राधान्य देत असल्याचे आपण पाहतो. सायकलिंगपटूही याकडे करिअर म्हणून पाहू लागले आहेत. मात्र, शहरात स्वतंत्र सायकलिंग ट्रॅक नसल्याने सायकलपटूंच्या चाकांना गती मिळेनाशी झाली आहे.

शहरात पाच वर्षांच्या बालकांपासून ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या बहुतांश जणांना सायकलिंगचा छंद लागला आहे. त्यामुळे शहरातील रिंगरोड व परिसरात सकाळच्या वेळी सायकलिंग करतानाचे चित्र आहे. काही सायकलिंग पटू तर याकडे करिअर म्हणून पाहू लागले आहेत. मात्र, त्यांच्यासाठी स्वतंत्र अशी सायकलिंगसाठी जागा नसल्याने अडचण निर्माण होत आहे. अनेकदा मुख्य रस्त्यावर सायकलिंग करताना अपघाताच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. अनेक खेळांच्या खेळाडूंसाठी व वॉकिंग करणाऱ्यांसाठी क्रीडा संकुल व इतर ठिकाणी मैदानाचा आधार आहे. मात्र, सायकलिंगपटूंना मुख्य रस्त्यावर सायकलिंग करण्याशिवाय वाव नाही.

शहरातील अरुंद रस्ते, अतिक्रमणांमुळे त्यांना मुख्य रस्त्याशिवाय पर्याय नाही. शहराच्या बाहेर त्यांच्यासाठी किमान २ फूट रुंद व २० किमी लांबीचा स्वतंत्र सायकलिंग ट्रॅक असणे आवश्यक आहे. जेणेकरून नवोदित खेळाडूंसह नागरिकांनाही त्याचा फायदा होईल. नांदेडसह पुणे, नागपूर, नाशिक येथे सायकलपटूसाठी स्वतंत्र सायकलिंग ट्रॅक आहे. याच धर्तीवर लातुरातही असा ट्रॅक विकसित व्हावा, अशी अपेक्षा सायकलपटूंची आहे.

सायकलिस्ट क्लबच्या माध्यमातूनही शेकडोजण रस्त्यावर...
शहरातील सायकलप्रेमींनी लातूर सायकलिस्ट क्लब सुरू केले आहे. या माध्यमातून दररोज शेकडोजण सायकलिंग करतात. लातूर- तिरुपती, लातूर- पंढरपूर असा प्रवासही ते नेहमीच करतात. यासह काही युवक अधून-मधून दिवसाकाठी २०० किमीपर्यंत सायकलिंगही करतात. यासह टूर डे हंड्रेडच्या माध्यमातून पुणे, सिंहगड, पानशेत, देहू- आळंदी, जेजुरी, सासवड, थेऊर, कात्रज घाटमार्गे खेड शिवापूर पुणे असा प्रवास करतात.

पालकांचीही मानसिकता बदलेल...
मुख्य रस्त्यावर मुलांना सायकलिंगसाठी पाठविण्यास पालक धजावत नाहीत. त्यामुळे स्वतंत्र ट्रॅक झाला तर उत्तमच आहे. त्यामुळे नवोदित खेळाडू सायकलिंगकडे वळतील, यासह सायकलिंग पटू म्हणून उदयास येणाऱ्या खेळाडूंनाही सरावासाठी हा ट्रॅक सोयीचा होईल. जेणे करून सायकलिंगची क्रेझ वाढून आरोग्याचेही रक्षण होईल.
 - संघर्ष शृंगारे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता सायकलपटू.

Web Title: Obstacle race as there is no separate track for cycling; Cyclists' wheels do not get speed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.